पुरोगामी राजकारणासाठी माणूसकेंद्री नव्या मांडणीची गरज – ऍड. प्रकाश आंबेडकर

पुणे  – मानसिक आघात करणे हे या देशातील सत्ताधार्यांचे तंत्र असून त्यांनी ते जनतेवर वेळोवेळी निर्दयीपणे अवलंबिले आहे, असे परखड मत भारिप – बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
केशव वाघमारे लिखित “खैरलांजी ते रोहित: दशकाची अस्वस्थता’ या पुस्तकाचे प्रकाशन ऍड. आंबेडकर यांच्या हस्ते श्रमिक भवन येथे पार पडले. यावेळी अभ्यासक राहुल कोसंबी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले हे उपस्थित होते.
ऍड. आंबेडकर म्हणाले, सामुदाईक हत्या करणे हा इथल्या जातीयवादी परंपरांचा भाग आहे. पूर्वी ही सामाजिक अत्याचार व्हायचे परंतु आता त्या अत्याचारांचे स्वरूप आर्थिक झाले आहे. त्यामुळे हा बदल लक्षात घेऊन नवी मांडणी केली पाहिजे व त्या मांडणीचा केंद्रबिंदू माणूस असला पाहिजे.
शर्मिष्ठा भोसले यांनी त्यांच्या मांडणीत पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनातील मानवी ओलावा आणि टोकदार राजकीय आशय यावर नेमकेपणाने बोट ठेवले. त्याचबरोबर पत्रकार म्हणून त्यांना आलेले अनुभव मांडताना डी-कास्ट आणि डी-जेंडर होण्याच्या गुंतागुंतीच्या व जटील प्रक्रियेकडे लक्ष वेधले. तर राहुल कोसंबी यांनी सध्या दलित चळवळ ही स्वतःच्याच विनाशाकडे चालली आहे हे मांडत असताना प्रामुख्याने वाढत्या अस्मितादर्शी जात जाणिवांकडे चिकित्सकपणे बघण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी पुस्तकाचे लेखक केशव वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करतांना भौतिक प्रश्नाला केंद्रस्थानी ठेऊन आंबेडकर वादाची पुनर्मांडणी करण्याची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक बसवंत विठाबाई यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी तर आभार मयुरी सामंत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)