पुरुष टेबल टेनिस संघाची आगेकूच, महिलांचा पराभव 

जकार्ता: भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने अरब अमिराती आणि व्हिएतनाम यांच्यावर एकतर्फी मात करताना आशियाई क्रीडास्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.मात्र भारताच्या महिला संघाने तीनपैकी दोन साखळी सामने जिंकताना सांघिक टेबल टेनिस विभागाच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र हॉंगकॉंगकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पुरुष सांघिक विभागात भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने संयुक्‍त अरब अमिरातीचा पराभव करताना विजयी सलामी दिली. अचंता शरथ कमल, जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय खेळाडूंनी आपापले एकेरी सामने सहज जिंकले. तैपेई चीनविरुद्ध एकमेव पराभव पत्करल्यानंतर भारतीय पुरुष संघाने संयुक्‍त अरब अमिरातीवर 3-0 अशी मात करताना आगेकूच केली. तसेच तिसऱ्या गटसाखळी लढतीत व्हिएतनामचाही 3-0 असा धुव्वा उडवून भारतीय पुरुष संघाने ड गटांत तिसऱ्या विजयाची नोंद केली. जी. साथियनने ऍन्ह तु एन्ग्युएनचा 3-2 असा पराभव करीत भारताला विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात अचंता शरथ कमलने ड्यूक तुएन एन्ग्युएनवर 3-0 अशी मात करीत भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. तर हरमीत देसाईने भारताच्या एकतर्फी विजयाची पूर्तता केली.
भारतीय महिलांना हॉंगकॉंगविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी अनुभवी मौमा दाससह अयहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पहिल्या गटसाखळी सामन्यात कतारचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात बलाढ्य चीनविरुद्ध भारतीय महिलांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या साखळी सामन्यात इराणचे आव्हान 3-1 असे मोडून काढताना भारतीय महिला टेबल टेनिस संघाने बाद फेरीत प्रवेश केला.
कतारविरुद्धच्या साखळी लढतीत मौमा दासने माहा अलीवर 11-3, 11-2, 11-4 असा विजय मिळवून भारताचे खाते उघडले. अयहिका मुखर्जीने अलिया मोहम्मदचा 11-2, 12-10, 11-2, 11-3 असा धुव्वा उडविताना भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. तर सुतीर्थाने माहा फरमर्झीवर 11-3,1 1-3, 11-6 अशी मात करताना भारताच्या विजयाची पूर्तता केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)