पुरवठा कार्यालयाच्या आगीने प्रश्नांचे काहुर

वाई शहरातील दुसरी घटना, सखोल चौकशी होणार का?
मयूर सोनावणे
सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) – प्रशासकीय कार्यालयांना आगी लागण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. गेल्या काही वर्षांपूर्वी वाई नगरपालिकेच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडली होती. ही घटना वाईकरांच्या मनावरुन पुसली जाते ना जाते तोच पुन्हा शनिवारी वाई येथील तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागाच्या कार्यालयास आग लागली. या घटनेत काही महत्वाच्या बाबी जळून खाक झाल्या आहेत. परंतु या आग लागण्याच्या प्रकारामुळे वाई शहरासह तालुक्यातील जनतेमध्ये प्रश्नांचे काहुर माजले असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
वाई तालुक्याच्या पुरवठा विभागात धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला होता. याप्रकरणी वाई येथील शिवसेनेचे शहर प्रमुख किरण खामकर यांनी चौकशीची निवेदनेही दिली होती. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नव्हते. तर वाई तालुक्याच्या पुरवठा विभागातील धान्य घोटाळा पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पंचतारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. या घाटोळ्यात प्रशासकीय अधिकार्‍यांपासून अनेकांचे हात बरबटले असल्याची खुमासदार चर्चाही तालुक्यात बराच काळ रंगली. सध्या वाई तालुक्याच्या पुरवठा विभागाचा जुना कारभारी बदलून गेला असून पुरवठा विभागाच्या कारभाराची धुरा नव्यान आलेल्या एक महिला अधिकारी सांभाळत आहेत. पुरवठा विभागातील नेतृत्व बदलानंतर लागलेल्या या आगीने शहरातील नागरिकांसह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
ही आग नेमकी शॉर्टसर्किटनेच लागली का? सकाळी सहा वाजता लागलेली आग तासभर कुणाच्याही लक्षात आली नाही याविषयीही कुतूहल व्यक्त होत आहे. तसेच शनिवारी लागलेल्या या पुरवठा विभागाच्या कार्यालयाच्या आगीची वरिष्ठ पातळीवर सखोल होणार का? असा प्रश्नदेखील वाई शहरासह तालुक्यातील जनतेला पडला आहे.

आगी कशा लागतात?
गेल्या काही वर्षांपूर्वी वाई शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला आग लागली होती. या घटनेतही महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. पालिकेच्या इमारतीला लागलेल्या आगीची घटना वाईकरांच्या मनामध्ये ताजी असतानाच शनिवारी वाई शहरात असलेल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कार्यालय पेटले. या घटनेतही महत्वाची कागदपत्रे जळाल्याचे सांगितले जाते. या आगीतून सुमारे 25 हजार नव्याने तयार केलेल्या शिधापत्रिका सुरक्षित राहिल्या आहेत. यापूर्वी कोरेगाव येथेही पुरवठा विभागाच्याच गोदामाला आग लागली होती. याच विभागाच्या गोदाम, कार्यालयांना आग लागतेच कशी, असा प्रश्न आहे.

-Ads-

शिधापत्रिकांचे वितरण का केले नाही?
वाई तालुक्या पुरवठा विभागात सुमारे 25 हजार शिधापत्रिका नव्याने तयार आहेत. या पत्रिका तीन-चार वर्षांपासून तयार होऊन गठ्ठ्यात पडून आहेत. मात्र तरीही या शिधापत्रिकांचे वितरण झालेले नाही. तालुक्यातील अनेक सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यावर लिहिण्यासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. आणि पुरवठा विभागाच्या कार्यालयात 25 हजार शिधापत्रिका पडून आहेत. त्यामुळे या शिधापत्रिकांचे वितरण का केलेले नाही? हा आणखी एक नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)