पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे : शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच काम करणार


संरक्षण विभागानेही दिले ना हरकत प्रमाणपत्र

-Ads-

पुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला संरक्षण विभागाने नुकतीच मान्यता दिलेली असून विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून येत्या आठवडाभरात या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे. भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्‍वासात घेऊनच काम करू. भूसंपादनासाठी विविध पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. थेट जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथे आजोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे विमानतळासाठीचा एक टप्पा पार पडला आहे. आता पुरंदर येथील विमानतळासाठीचा भूसंपादन हा एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे.

शिवतारे म्हणाले, भूसंपादनासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला आठ दिवसात परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पुरंदर विमानतळासाठी लागण्याऱ्या एकूण जागेपैकी 1 हजार 200 एकर जागा ही शासनाची आहे.

काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे राजकीय विरोधक सांगत आहे. मात्र हा गैरसमज असून वास्तव तसे नाही. पुरंदर विमानतळ झाल्यास राजकीय अडचण होण्याच्या भीतीने आपले हितसंबंध जपण्यासाठी काही राजकीय लोक विरोध असल्याचे दर्शवित आहे.

देशातील सर्वात मोठे “कार्गो हब’
पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 2800 हेक्‍टर जागा लागणार आहे. एवढी मोठी जागेवर विमानतळाबरोबरच निर्यात केंद्रही उभारले जाणार आहे. कृषी माल मोठ्या प्रमाणावरून या ठिकाणाहून परदेशात पाठविला जाईल. पुरंदर विमानतळावरून प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होईल. देशातील सर्वात मोठे कार्गो हब विमानतळाच्या माध्यमातून होणार आहे. एक्‍सपोर्ट हब म्हणूनही पुरंदर विमानतळ ओळखले जाईल, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)