पुरंदर विमानतळावर आणखी दोन धावपट्ट्या असाव्यात

तज्ज्ञांचे मत : पुढील सुमारे 50 वर्षांचे नियोजन करणे आवश्‍यक

पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणाना पुढील सुमारे 50 वर्षांचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. सध्या पुरंदर विमानतळावर दोन धावपट्ट्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून आणखी दोन पर्यायी धावपट्ट्या निर्माण कराव्यात, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञांकडून होत आहे.

विमानतळाचा ‘डीपीआर’ करणे सुरू
मागील काही वर्षात जागेच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे भूसंपादनात येणारे अडथळे यामुळे भविष्यात विमानतळावरील धावपट्ट्यांची संख्या वाढविणे, त्यांच्या लांबीत वाढ करणे अशा अनेक अडचणी येतात. यासर्व गोष्टींचा विचार करून विकसित करणाऱ्या विमानतळांमध्ये कमीत कमी दोन व त्यापेक्षा अधिक धावपट्ट्या असाव्यात, अशी मागणी होत आहे. पुरंदर येथील विमानतळाचा ‘डीपीआर’ (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम जर्मन येथील डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विमानतळाचा आराखडा तयार करतानाच भविष्यातील गरज लक्षात घेऊन आणखी दोन धावपट्टींचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी या क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.

पुरंदर विमानतळाला मागील आठवड्यात संरक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे विमानतळासंदर्भातील हवाई दलाचा असलेला अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आता विमानतळ उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सुमारे 2 हजार 400 हेक्‍टरवर हे विमानतळ उभारले जाणार आहे. हे विमानतळ पुणे जिल्ह्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी फायदेशीर होणार आहे.

-Ads-

प्रवाशांची वाढती संख्या आणि पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराची गरज लक्षात घेऊन मोठ्या व लांबपल्ल्याचे विमान उतरणे शक्‍य व्हावे, यासाठी या विमानतळावर किमान 4 हजार मीटरच्या दोन धावपट्ट्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन धावपट्ट्यांमुळे विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग यांच्या वेळेत मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच विमानांची संख्या वाढविणे हे देखील त्यामुळे शक्‍य होणार आहे.

याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातून परराज्य व परदेशात होणारी माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता आहे. वेगाने या क्षेत्राचा विकास होत आहे. त्याचा विचार करून दोन धावपट्ट्यांबरोबर पर्यायी व्यवस्था असावी म्हणून चार धावपट्ट्या असाव्यात, अशी मागणी होत आहे. यापूर्वी देशात जी विमानतळे उभारण्यात आली. त्यामध्ये बहुतांश ठिकाणी एकच धावपट्टी आहे. त्यामध्ये लोहगाव विमानतळाचा समावेश आहे. पूर्वी विमानांचा आकार मर्यादित होता. त्यामुळे त्या पद्धतीने धावपट्टी उभारण्यात आली होती. मात्र एका धावपट्टीमुळे अनेक गोष्टींवर मर्यादा येतात.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)