पुरंदर विमानतळामध्ये तरुणांना नोकरीची आशा

राहुल शिंदे

नीरा, दि. 30 – पुरंदर तालुक्‍यात होणाऱ्या विमानतळाला लोकांचा विरोध होत असला तरी प्रशासनाकडून विमानतळाबाबत अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून शेतकरी व तरुण चिंतातूर झाला आहे. त्यातच आजूबाजूच्या परिसरातील गावातून लागणारे गुंठेवारीचे फलक व त्यावर ठळकपणे विमानतळापासूनचे सांगितलेले अंतर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाचा घोर वाढवत आहे.
पुरंदरमध्ये विमानतळ होणारच असे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जाते. त्या संदर्भात अनेक वेळा वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी ही लवकरच विमानतळ होणार असे म्हटले आहे. तालुक्‍याचे प्रतिनिधी विमानतळ आपणच आणल्याचे सांगत आहेत तर खासदार विमानतळ व्हायला हवे पण लोकांना विश्वासात घेऊन असे म्हणत आहेत. प्रत्यक्षात मात्र, याबाबत बाधितांपर्यंत कोणीच जात नाही. नाही म्हणायला सुरवातीच्या काळात विमानतळ विरोधी आंदोलने शमविण्यासाठी व लोकांना शांत करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी एकदा लोकांशी संवाद साधला होता. कोणावर अन्याय होवू देणार नाही असे आश्वासन दिले. सत्ताधारी लोकांचा विमानतळला पाठींबा असल्याचे सांगत आहेत. मात्र, जिल्हा परिषदेची झालेली निवडणूक विमानतळच्या मुद्यावर झाली.
या भागातील लोकांशी कोणताही संवाद न करता प्रशासन याबाबत वेगवेगळ्या घोषणा करीत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून या भागातील लोकांचे जीवन अस्थिर झाले आहे. लोकांच्या भविष्यातील अनेक योजना ठप्प झाल्या आहेत. विमानतळ होईल का? झाले तर ते नक्की कसे असेल? या भागातील आपले अस्तित्व टीकेला का? आपल्या पुढील पिढीस निर्वासितांचे जीवन जगावे लागेल का? असे अनेक प्रश्न या भागातील लोकांना पडले असून या बाबत उत्तरे शोधण्याचा लोक प्रयत्न करीत आहेत.
विमानतळाबाबत येथील काही तरुण उत्सुक दिसतात. विमानतळ व्हावे असे त्यांना वाटत असले तरी होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये या भागातील तरुणांना किती हिस्सा मिळेल याबाबत तरुणाई साशंक आहे. राज्यात आत्तापर्यंत झालेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्या नाकारून परप्रांतीयांना नोकऱ्या देण्याचा कटू अनुभव येथील येथील तरुणांनी अनुभवला आहे. आगदी जवळच्या जेजुरी औद्योगिक वसाहतीचे उदाहरण बोलके आहे. विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मूळ स्थानिकासाठी दिल्या जाव्यात असाही एक विचार प्रवाह निर्माण झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)