पुरंदर मधील मेंढपाळांना वनविभागाकडून मदत

काळदरी- पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडी येथील वळण वस्तीवर चार बिबट्यांनी 300 मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला होता. या हल्ल्‌यात 15 मेंढ्यांचा मृत्यू तर 50 मेंढ्या बेपत्ता झाल्या होत्या. येथे रात्री दीड वाजल्यापासून चार बिबट्यांनी नामदेव तुकाराम कोकरे आणि बाबू रामभाऊ कोकरे यांच्या पालावर हल्ला केला. वाघरेतील 300 शेळ्या मेंढ्यावर बिबट्यांनी झडप घातली घाबरलेल्या शेळ्या मेंढ्यांनी वाघर तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुमारे 15 मेंढ्यांचा बिबट्यांनी जीव घेतला. संतप्त मेंढपाळानी मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली मेलेल्या मेंढ्या ट्रॅक्‍टरमध्ये घालून सासवड पोलीस ठाण्यात नेल्या होत्या, त्यानंतर तेथून तहसील कार्यालय येथे नेऊन नुकसान भरपाई देण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले होते.
वनविभागाच्या सासवड परिक्षेत्र अधिकारी सुजाता जाधव यांनी 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. परंतु, मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे न मिळाल्याने मेंढपाळांनी पुन्हा बाबाराजे जाधवराव यांची भेट घेतली. त्यावेळी मेंढपाळांना नुकसान भरपाई न दिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच जिल्हा वनअधीक्षक यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यातील नामदेव तुकाराम कोकरे यांना 42000 रुपये, बाबू रामा कोकरे यांना 60000 रुपये तसेच कामाजी तुकाराम कोकरे यांनी 18000 रुपये असे एकूण एक लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. दरम्यान, यानंतर सर्व मेंढपाळांनी बाबाराजे जाधवराव यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना मनसेचे शेतकरी संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले की, या भागात बिबट्यांचा सतत वावर असल्याने जनावरां बरोबरच माणसांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे आम्ही वनविभागाकडे पिंजरे लावण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी आमची केवळ समजूतच काढली. पिंजरे लावले मात्र कुणालाही न सांगताच परत काढून नेले आणि त्यामुळेच मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने यातून दोन शेतकरी बचावले आहेत. परंतु, वनखात्याचे अधिकारी इतके मुजोर झाले आहेत की, त्यांना राजकीय पाठबळ असल्यानेच माणसांच्या जीवाची किंमत नाही. मात्र, यापुढे अशी घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तालुक्‍यातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जाधवराव यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)