पुरंदर पंचायत समितीवर रिपाइंचे जागरण गोंधळ

सासवड- पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथील बौद्ध वस्तीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, सुस्त व निर्ढावलेल्या पंचायत समिती प्रशासनाला झोपेतुन जागे करण्याकरीता आणि भ्रष्ट
अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज (सोमवारी) सासवड येथील पुरंदर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जागे व्हावे, असे आरपीआयचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भोसले यांनी सांगितले.
नायगावच्या बौद्धवस्तीमध्ये झालेल्या सिमेंट कॉंक्रेट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच या कामाबाबत तक्रार असताना देखील सदर काम करणा-या ठेकेदारास धनादेश देणा-या अधिका-यावर आणि हा धनादेश देण्याचे आदेश देणा-या अधिका-यावर कारवाई करण्यात यावी यांसह ग्रामपंचायत फंडातील 15 टक्के रक्कम दरवर्षी दलित वस्तीत खर्च करण्याबाबत ग्रामसेवकांना आदेश देण्यात यावेत, तसेच चौदाव्या वित्तआयोगाच्या ग्रामपंचायतीला थेट मिळणा-या निधी मधील काही निधी बौद्ध, चर्मकार व मातंगवस्तीमध्ये खर्च करण्यात यासाठी पुरंदर पंचायत समिती कार्यालय येथे जाहिर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार ऍड. एल. टी. सावंत, जिल्हासंपर्क प्रमुख श्रीकांत कदम, महिला आघाडीच्या ऍड. ज्योती गायकवाड, खेडचे संतोष डोळस, हवेलीचे सतीश केदारी यांसह जिल्हा व तालुक्‍याचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका अध्यक्ष पंढरीनाथ जाधव, उपाध्यक्ष नामदेवराव नेटके, युवाध्यक्ष गौतम भालेराव, माळशिरस गणप्रमुख स्वप्नील पाटोळे यांनी नियोजन केले.
पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. तसेच नायगावच्या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल असे सांगितले. यामध्ये कमिटीत बांधकाम विभागाचे उपअभियंता, पंचायत समितीचे एक सदस्य आणि आरपीआयचे विष्णु भोसले, स्वप्नील पाटोळे यांचा समावेश राहील. ही समिती या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सभापतींकडे अहवाल सादर करणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत फंडातील 15 टक्के रक्कम दरवर्षी दलित वस्तीत खर्च करण्याची मागणी मंजूर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)