पुरंदरमध्ये झेंडूचे मळे लागली फुलू

नीरा- पुरंदर तालुक्‍याचा दक्षिण पूर्व पट्ट्यातील अनेक मळे झेंडूच्या फुलांमुळे पिवळे धमक दिसत आहेत. आगामी नवरात्र, दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पीक तोडण्या योग्य होईल या नियोजनाने लावलेले मळे आता फुलू लागली आहेत. टपोरी झेंडूची फुले येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सणांच्या काळात पुजेसाठी झेंडूच्या फुलांना सर्वांधिक मागणी असते. अवघ्या नव्वद दिवसांत पीक येत असल्याने हे नगदी पिकात गणले जाते. यावेळी पुरंदरमधून चांगल्या प्रमाणात झेंडूची लागवड झाल्याचे दिसून येत आहे. येथील बहुतांशी शेतकरी केवळ पावसाच्या पाण्यावर झेंडूचे पीक घेतात. पूर्व पट्ट्यातील कायम दुष्काळ सदृश स्थिती पाहता झेंडूचे पीक कमी कालावधीत शेतकऱ्यांना चांगला आर्थिक मोबदला देऊन जाते. मात्र, गेल्या वर्षी या सोनेरी पिवळ्या पिकाने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. ऐन दसरा-दिवाळीत भाव पडल्याने अनेकांच्या हाती उत्पादन खर्चही आला नाही. दौंडज (ता. पुरंदर) येथील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूचे पीक घेतले होते. मात्र, ऐनवेळी भाव पडल्याने शेतकऱ्यांना झेंडू तोडून रस्त्याच्या कडेला टाकावा लागला तर काहींनी उभे पीक जनावरांना खाऊ घातले होते.
तालुक्‍यातील सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा या मोठ्या गावातील बाजारात सणांच्या काळात झेंडूला विशेष मागणी असते. या परिसरात जुना गोंडा जातीचा झेंडू मोठ्या प्रमाणावर उत्पादीत केला जातो. पुरंदर तालुक्‍यातील सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा परिसरातील छोट्या शेतकऱ्यांसह मोठ्या बागायतदारांनी देखील झेंडूची लागण मोठ्या प्रमाणावर केली आहे.
खंडेनवमीला औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या मिशनरी पुजनासाठी पारंपरिक पद्धतीने आपटा (सोने) व झेंडूच्या फुलांना मान असतो. आज पंधरा ते वीस रुपये किलो भाव असला तरी उत्सव काळात मात्र ऐंशी ते शंभर रुपये किलो दर मिळू शकतो असा अंदाज येथिल शेतकरी व्यक्त करीत आहेत. दसऱ्याच्या सणाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी जेजुरी व नीरा येथे रेल्वेने झेंडूची खरेदी करण्यासाठी येतात. या काळात मोठ्या प्रमाणात जेजुरी व नीरा रेल्वे स्थानकावरून रेल्वेने झेंडूची वाहतूक केली जाते. कोयना व सह्याद्री एक्‍स्प्रेसने मुंबईचे व्यापारी उत्सव काळात दोन दिवस येतात व मळेच्या मळे खरेदी करतात. दरम्यान किमान यावेळी तरी या केशरी-पिवळ्या फुलांनी बळीराजाला हसवावे अशी अपेक्षा परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)