पुरंदरमधील विमानतळासाठी थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करणार

पुणे – पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात येणार आहेत. भूसंपादनासाठी लागणारा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबरच (एमएडीसी) हुडको, सिडको आणि पीएमआरडीए यांच्या बीजभांडवलातून उभारण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्‍यातील 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून यापूर्वीच मान्यता दिली आहे.

विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये लागणार आहेत. हा निधी उभारण्यासाठी आणि विमानतळ विकसनाचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एमएडीसीबरोबरच सिडको, हुडको आणि पीएमआरडीए यांना या कंपनीत स्थान देण्यात येणार आहे. त्यास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीदेखील आज दुजोरा दिला. ते म्हणाले, भूसंपादनासाठी लागणारा निधी या संस्थांकडून प्रत्येकी 1 हजार कोटी रुपये याप्रमाणे बीजभांडवल म्हणून घेण्यात येणार आहेत. त्यातून हा निधी उभा करण्यात येणार आहे. या संस्थांकडे पैसा पडून आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर समृद्धी महामार्गाप्रमाणेच विमानतळासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमिनी सरकारकडून खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे विमानतळासाठीचे भूसंपादन गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. येत्या महिनाभरात यासंदर्भातील निर्णय होईल.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)