पुरंदरच्या हितासाठी विमानतळाला विरोध नको

शरद पवार यांचे येथे प्रतिपादन : काळेवाडी येथे पार पडली पहिली राज्यस्तरीय अंजीर परिषद

सासवड – एखादा प्रकल्प होत असताना संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागतात. त्यामुळे थोडे दुःख होणे स्वाभाविक आहे. म्हणून संपूर्ण प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही. पुरंदर तालुक्‍यात नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होत असल्याने यामुळे केवळ पुरंदरच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरांतील पाच ते सहा जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच हा प्रकल्प म्हणजे पुरंदरचे भाग्य बदलणारा प्रकल्प आहे. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका न घेता शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होतील. तसेच शेतकऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि तो प्रश्‍न सोडवावा, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे.

काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ, पुणे व जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय अंजीर परिषद आणि अंजीररत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या परिषदेचे उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.

-Ads-

शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार पिक पद्धतीत बदल करणे आवश्‍यक आहे. तसेच ज्या भागात पाणी आहे त्याभागात आधुनिक पद्धतीने शेती करून फळबाग लागवड करावी. तर ज्या भागात कमी पाणी आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याऐवजी शेती पूरक व्यवसाय तसेच छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत. त्याचप्रमाणे पुरंदर येथे विमानतळ प्रकल्प होत असल्याने उद्योग व्यवसायाच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादन होणार असले तरी प्रकल्पाबाहेरील एक इंचही जमिनीचे संपादन होणार नाही. त्यामुळे त्या भागात उद्योग सुरू करण्यास मोठा वाव आहे.

गुंजवणी धरणाच्या पाण्याबाबत पवार म्हणाले की, पुरंदरमध्ये टंचाई कायम आहे व पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाणी येत असताना त्यामध्ये मतभेद करण्यापेक्षा तालुक्‍यात पाणी साठा कसा वाढेल याचवर सकारात्मक चर्चा करा. त्या पाण्यावर उसाचे पिक घेण्यापेक्षा फळबाग लागवड करण्याचे नियोजन करा, असाही सल्ला दिला.

यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, शेतकऱ्यांनी अंजीर या फळ पिकांचे उत्पादन घेत असताना जागतिक बाजार पेठेत आपला वाटा किती याचा व्यापक विचार करावा. त्याचप्रमाणे राज्याचे कृषिमंत्री यांच्यासोबत शेतकरी यांच्यासोबत बैठक लावून अंजिराची आयात आणि निर्यात याबाबत चर्चा केली जाईल.

या प्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर, अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे दिवे येथील अंजीर संशोधन केंद्राचे माजी प्रमुख अधिकारी डॉ. विकास खैरे यांनी अंजीर फळबागेची लागवड, हवामान, खतांचे प्रमाण, प्रतवारी, मार्केटिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, म्हाडाचे माजी अध्यक्ष संभाजी झेंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, सारिका इंगळे, जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, तहसीलदार सचिन गिरी, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, विशाल पतसंस्थेचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल महाराष्ट्र अंजीर उद्‌पादक संशोधन संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाख, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव सुरेश सस्ते, खजिनदार प्रदीप पोमण यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.

या वेळी शरद पवार यांच्या हस्ते सीताराम देशमुख, परभणी. अरुण देवरे, नाशिक. समीर डोंबे, दौंड, जि. पुणे. समीर काळे, काळेवाडी, दिवे, ता. पुरंदर. शांताराम खेडेकर, गुरोळी, ता. पुरंदर. दीपक जगताप, निम्बूत, ता. बारामती. संभाजी पवार, वाल्हे, ता. पुरंदर. महादेव गोगावले, गोगावलेवाडी, ता. हवेली. दत्तात्रय घुले, कुंजीरवाडी, ता. हवेली. या शेतकऱ्यांना सपत्नीक अंजीर रत्न पुरस्कार तर दिवे येथील अंजीर संशोधन केंद्राचे माजी प्रमुख अधिकारी डॉ. विकास खैरे यांना शास्त्रज्ञ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविक अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघाचे सुरेश सस्ते यांनी केले.

गुंजवणीचे पुढील दोन ते तीन महिन्यात कोणत्याही प्रकारे कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी राज्याने आणि केंद्रानेही मोठा निधी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत कोणताही गैरसमज करू नये. सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. तर विमानतळ प्रकल्पाबाबत काही व्यक्‍ती अनेक मते व्यक्‍त करीत असल्याने शेतकरी संभ्रमात आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना जास्त फायदा कसा होईल याचेच नियोजन आहे. यामध्ये शेतकऱ्यांना समजावून त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा.
– विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)