पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, ही काळ्या दगडावरची रेघ

पालकमंत्री गिरीश बापट : हडपसरमध्ये भुयारी मार्ग आणि पुरवठा कार्यालयाचे उद्‌घाटन

हडपसर – सन 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ससाणेनगर-सय्यदनगर येथील दोन भुयारी मार्गांच्या भूमिपूजन समारंभ आणि हिंगणे मळा हडपसर ड-विभाग अन्नपुरवठा कार्यालयाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक संजय घुले, नगरसेविका उज्ज्वला जंगले, रंजना टिळेकर, वृषाली कामठे, मनिषा कदम, नगरसेवक विरसेन जगताप, मतदार संघाचे अध्यक्ष सुभाष जंगले, महिला आघाडी अध्यक्षा वंदना कोद्रे, शशिकला वाघमारे, संजय सातव, संदीप शेंडगे, सरपंच शिवराज घुले, गणेश घुले, उपसरपंच अमित घुले, रवी तुपे, वैभव माने, योगेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री बापट म्हणाले की, हडपसरची आजवरची अनेक नेतृत्व कुचकामी ठरली आहेत. पण, भाजपने येथे रखडलेली विकासकामे अवघ्या साडेचार वर्षांत मार्गी लावली आहेत. पुण्यातील 8 विधानसभा मतदार संघापैकी हडपसर विधानसभा मतदार संघाला सर्वात जास्त निधी दिला आहे. यापुढे आणखी अधिक निधी दिला जाईल. ज्यांची संस्कृती गाढवपणाची आहे, त्यांनीच गाढवाचे फ्लेक्‍स लावले असावेत. मात्र, आमची संस्कृती विकासाची आहे, असा शब्दांत ससाणेनगर येथे लावलेल्या “गाढव विकणे आहे’, या फ्लेक्‍सचा समाचार त्यांनी घेतला. तर, सर्कशीत जसे एखादे विदूषक असते तसे हडपसर मतदारसंघात एक विदूषक फिरत आहे, अशा मिश्‍किल शब्दांत खासदार आढळराव पाटील यांचे नाव न घेता बापट यांनी त्यांच्यावर टीका केली.

आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या पालकमंत्र्यांची किंमत नाही. त्यामुळे फक्त भूमिपूजन करतात. आम्हाला आहे म्हणून भूमिपूजन करून काम पूर्ण करणार आणि ते फलदायी ठरणार आहे. गेल्या 15 वर्षांत 3 वेळा उड्डाणपुलाचे फक्त उद्‌घाटन करणाऱ्यांना स्वतःचे साधे कार्यालय हडपसरला उघडता आले नाही. पोरकटपणा म्हणून माझ्यावर टीका करणाऱ्यांना आता निवडणूका जवळ आल्याने माझ्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी असल्याची टीका खासदारांवर आमदार टिळेकर यांनी केली.

नगरसेवक संजय घुले यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, लोकप्रतिनिधी केवळ फ्लेक्‍सबाजी करून जनतेची फसवणूक करत आहेत. विकासकामे करणाऱ्या आमदार टिळेकर यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे, आवाहन त्यांनी केले. याशिवाय खासदार प्रत्येक वेळी येतात आणि 20 कोटींच्या कामाचा उल्लेख करतात. त्यांनी ही कामे कोठे केली आहेत ते दाखवावे. मी त्यांना रोख 51 हजारांचे बक्षीस देईन, असे घुले म्हणाले.

विरोधकांना उमेदवार आयात करावा लागतोय
साडेचार वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे पाहून आता आपला आमदार टिळेकर यांच्यासमोर निभाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभेला उमेदवार आयात करण्याची चर्चा आहे. मात्र, आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी जनता मी केलेल्या विकासकामांला साथ देईल, हे मला माहित आहे, असा विश्वास आमदार टिळेकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)