पुणे – शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात पक्षकाराकडून वकिलाला धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पक्षकाराकडून कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात वकिलाला धक्‍काबुक्‍की करण्याची ही दुसरी घटना आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात वकिलांना मारहाण झाल्याने कौटुंबिक न्यायालयातील परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली असून न्यायालयीन प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे.

कौटुंबिक न्यायालयात न्यायालयीन कक्षात ऍड. कमलेश कुलट यांना पक्षकाराने धक्‍काबुक्‍की केल्याची घटना मंगळवारी घडली. यापूर्वी कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात एका वकिलाला पक्षकाराने धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेचा निषेध फॅमिली कोर्ट ऍडव्होकेट्‌स असोसिशनचे अध्यक्ष ऍड. नियंता शहा आणि पदाधिकाऱ्यांनी केला.

या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची सभा आयोजित करण्यात आली. ऍड. नियंता शहा, ऍड. अभय शिरसाट, ऍड. गीतांजली कडदे, ऍड. हेमंत गानू आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड. सुभाष पवार उपस्थित होते. संघटनेकडून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. पी. फडणीस यांना निवेदन देण्यात आले. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी न्यायालयाने पक्षकारांवर कायदेशीर कारवाई करावी. अशा घटनांमुळे न्यायालयाचा अवमान होतो, असे निवेदनात म्हटले आहे.

कोट :
कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त असतो. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस तळमजल्यावर घोळक्‍याने थांबलेले असतात. कौटुंबिक न्यायालयातील इमारतीत प्रत्येक मजल्यावर पोलिसांचा बंदोबस्त हवा. त्यामुळे न्यायालयीन कक्ष तसेच आवारातील वाद झाल्यास तातडीने अशा घटना रोखता येतील.
– ऍड. नियंता शहा, अध्यक्ष फॅमिली कोर्ट ऍडव्होकेट्‌स असोसिशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)