पुन्हा एकदा देश गँगरेपने हादरला; आरोपींना कब्रस्तान न देण्याची मुस्लिम समाजाची घोषणा

मंदसौर (मध्य प्रदेश): पुन्हा एकदा देश गँगरेपने हादरला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये सात वर्षीय मुलीवर गँगरेप झाला. नराधमांनी हे कृत्य करत चिमुकलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. या बलात्कारानंतर मध्य प्रदेशातील जनता रस्त्यावर उतरत आहे.

मंदसौरमध्ये 26 जून रोजी पीडित चिमुकलीचे शाळा सुटल्यानंतर अपहरण केले होते. या मुलीला चॉकेलट-कॅण्डीचे आमिष दाखवून तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिच्या गळ्यावर वार करुन अर्धमेले करुन झाडीत फेकून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीडित चिमुकली तिसरीत शिकते. तीचे अपहरण झाल्याची तक्रार केल्यानंतर, पीडितेची शोधाशोध घेण्यात आली. त्यावेळी ती शहरातील बस स्टॅण्डजवळ एका झाडीत जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने इंदोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती जीवन-मृत्यूचा सामना करत आहे.

याप्रकरणातील आरोपी इरफानला 27 जूनला आणि आसिफला 29 जूनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफानला 2 जुलैपर्यंत रिमांड रुममध्ये पाठवले आहे.  या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. मुस्लिम समाजानेही आक्रमक पवित्रा घेत, आरोपींना फाशीची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी कब्रस्तानामध्ये जागा देणार नाही, अशी घोषणाही मुस्लिम समाजाने केली. याप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी  होत असताना, स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही आरोपींना फाशीच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)