20 व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक राजकारणावर दीर्घकाळ अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुध्दाचा प्रभाव होता. सर्व राजकारण याच देशांभोवती फिरत होते.आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.सीरियावरील हल्ला हे त्याचे कारण आहे.अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस या तीन राष्ट्रांनी अपेक्षेप्रमाणे संयुक्त कारवाई करताना सीरियावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारने आपल्याच देशातील निदर्शकांवर रासायनिक हल्ल्यांचा वापर केल्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचे सांगीतले जात आहे.

सीरियावरील कारवाईमुळे पश्‍चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्‍यता असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकणार यात शंका नाही. युध्दापाठोपाठ महागाई आपोआपच येते.त्याची लक्षणे आतापासूनच दिसायला लागली आहेत.या संघर्षाशी कोणताही संबंध नसलेल्या भारतासारख्या देशांना याचा फटका सर्वात जास्त बसणार आहे. म्हणूनच भारतालाही आगामी काळातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर होणाऱ्या या हल्ल्यांचे संकेत आधीच दिले असले तरी या हल्ल्याच्या आडून रशिया आणि उत्तर कोरिया यांना इशारा देण्याचे काम त्यांनी केले आहे.कारण अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी आता अमेरिकने रशियावरही हल्ला करून त्यांना धडा शिकवला पाहिजे असे म्हटले आहे. सीरियातील अत्याचारी नेता असद यांच्या राजवटीला रशियाचा पाठिंबा आहे त्यामुळेच ते रासायनिक हल्ल्यांसारखे धाडस करू शकतात त्यामुळे रशियावरही अमेरिकने हल्ला करून त्यांना धडा शिकवला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे याला अर्थ आहे.

सीरियातील बशर अल असद सरकारला पाठिंबा देत रशियाने सीरियात मोठे लष्करी तळ उभारले आहेत ही बाब काही लपून राहिली नाही. पण हा हल्ला करताना रशियन लष्करी तळाला त्याची झळ पोहचू नये याची दखल अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी घेतली आहे. पण पुढील वेळी अमेरिका अशी दक्षता घेईल अशी खात्री नसल्यानेच युध्दाचे ढग जमायला सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.कारण एकीकडे या कारवाईचे समर्थन केले जात असताना दुसरीकडे या कारवाईला विरोधही होत आहे.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी ही कृती गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे.अमेरिका आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात अशी उघड भुमिका घेतली जाउन लागल्याने आता जगाचे झपाट्याने धृवीकरण होउन पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया यांच्यात लष्करी संघर्ष सुरु होणे आता अपरिहार्य आहे.

अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढणार असून दोन्ही देशांकडून युद्धाची भाषा सुरु आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियालाही मिसाईल हल्ल्याची धमकी दिली होती. तर सीरियाच्या दिशेने अमेरिकेने मिसाईल डागले तर आम्ही ते पाडू आणि जिथून ते मिसाईल आले आहे त्या तळावर मिसाईल हल्ला करु अशी धमकी बेरुतमधील रशियन राजदूताने दिली आहे. खरेतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपुर्वी सीरियामधून आपले सैन्य मागे घेणार असल्याचं म्हटले होते.मात्र सीरियाच्या बंडखोरांच्या रासायनिक हल्ल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला शिवाय सिरीयावर हल्लाही केला.रशियाचे अध्यक्ष पुतीनही महत्वाकांक्षी आहेत आणि रशियाला पुर्वीचे दिवस दाखवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

अमेरिकेच्या विरोधात उभे राहूनच आपण हे काम करु शकू याची खात्री त्यांना आहे.म्हणूनच सीरियाला सर्व ती मदत करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. पुतीन स्वत: धोरणी आणि हुशार आहेत.पण हा मुत्सद्दीपणा ट्रंप यांच्याकडे नाही. ते उतावीळ आणि आक्रमक आहेत. त्यांच्या दोषांच्या आधारेच त्यांना लष्करी संघर्षाच्या सापळ्यात अडकवण्याचा पुतीन यांचा डाव आहे आणि सीरियावरील हल्ल्यानंतर त्यांचा हा डाव यशस्वी झाला आहे असे म्हणावे लागते.शीतयुध्दाच्या समाप्तीनंतर आणि रशियाच्या विघटनानंतर जागतिक राजकारणात रशियाची चर्चा होणेच थांबले होते.नंतरच्या काळात सुदैवाने अमेरिकेचे नेतेही मुत्सद्दी आणि संयमी असल्याने त्यांनी रशियाला महत्व देण्याचेही टाळले होते.पण ट्रंप अध्यक्ष झाल्याचा फायदा उठवत रशियाने पुन्हा पाय पसरवायला सुरुवात केली.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्याऐवजी ट्रंप यांनी विजयी व्हावे म्हणून पुतीन यांनी किती प्रयत्न केले होते ही बाब काही लपून राहिली नव्हती. अमेरिकेच्या नेतेपदी ट्रंप यांच्यासारखा नेता आला तरच आपला फायदा होणार आहे हे हेरुनच पुतीन यांनी ती खेळी केली होती आणि आता सिरीयावरील हल्ल्याच्या निमीत्ताने पुतीन यांना अमेरिकेला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे.आगामी काळात या संघर्षात उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग यानेही रशियाच्या बाजुने उडी घेतली तर आश्‍चर्य वाटायला नको.किम जोंग हा सुध्दा ट्रंप यांच्याप्रमाणेच उतावीळ आणि संघर्षप्रिय नेता असल्याने तोही एखादी माथेफिरु कृती करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुतीन यांची महत्वाकांक्षा आणि ट्रंप व किम जोंग यांचा अपरिपक्वपणा जगाला भयानक लष्करी संघर्षाच्या किनाऱ्यावर आणून सोडणार आहे.त्याचे इतर परिणामही जाणवणार आहेत.पश्‍चिम आशियातील या अस्थिरतेचा विपरीत परिणाम कच्च्या तेलांच्या किमतीवरही झाला आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सीरियावरील कारवाईमुळे पश्‍चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्‍यता असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकणार यात शंका नाही. युध्दापाठोपाठ महागाई आपोआपच येते.त्याची लक्षणे आतापासूनच दिसायला लागली आहेत.या संघर्षाशी कोणताही संबंध नसलेल्या भारतासारख्या देशांना याचा फटका सर्वात जास्त बसणार आहे. म्हणूनच भारतालाही आगामी काळातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला आपल्या भारताचे एकमेव धोरण म्हणजे प्रत्येक बाबतीत त्यावर बारकाईने नजर ठेवणे त्यांशिवाय आपण कोणतीच कृती करू शकत नाही परंतु वरील अग्रलेखात चीन ह्या देशाचा शब्दाने सुद्धा नामोल्लेख नाही हांचे आस्चर्य वाटते आणि भरता सारखा देश नगण्य ठरतो हे कसे ? कारण आपले महत्व म्हणचे झालेल्या होणाऱ्या व हौघाटलेल्या घटनेचे साक्षीदार असणे ह्या शिवाय आपले महत्व नसते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)