पुनर्वसन केलेले हातगाडी व्यावसायिक चिंतातूर

ग्राहक फिरकेना : अयोग्य ठिकाणी पुनर्वसन केल्यामुळे हातगाडी धारक नाराज

दापोडी, (प्रतिनिधी) – कारवाई केलेल्या हातगाडी धारकांचे ग्राहक नसलेल्या ठिकाणी पुनर्वसन केल्यामुळे मागील 20 दिवसांपासून हातगाडीचा व्यवसाय थंडावला आहे.

खडकीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दूर करण्याकरीता खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड व खडकी पोलिसांनी वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या पथारी व हातगाडी धारक व बेशिस्त रिक्षा चालक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तीन महिन्यांपूर्वी एक संयुक्‍त मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत बेकायदेशीर हातगाडी व पथारी व्यावसायिक, स्टॉल, टपरी, दुकानासमोरील वाढीव अतिक्रमण आदीवर सरसकट कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे काही अंशी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दूर ही झाला, मात्र ज्यांच्याकडे रितसर परवाना आहे, कॅंटोन्मेंटला रितसर भाडेही भरले जाते, अशा हातगाडी धारकांवर बोर्डाने कारवाई केल्यामुळे हातगाडी धारकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.

गोल मार्केट येथील हातगाडी धारकांनी या अन्यायकारक कारवाई विरोधात मार्च महिन्यात खडकी कॅंटोन्मेंट कार्यालयाच्या समोर बेमुदत चक्री उपोषण आंदोलन छेडले. हातगाडी धारक संघटनेचे रफीक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात महिला व्यावसायिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. कॅंटोन्मेंट सदस्य मनीष आनंद यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी केली. “सीईओ’ अमोल जगताप यांनी या वेळी हातगाडी धारकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर हातगाडी धारकांनी आंदोलन मागे घेतले.

यानंतर 1 मे रोजी कारवाई केलेल्या 35 हातगाडी धारकांचे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने जुन्या पाण्याच्या टाकीसमोर वर्दळीच्या व अरुंद अशा फॅक्‍टरी रोडलगत पुनर्वसन करण्यात आले. मात्र हे पुनर्वसन प्रायोगिक व हंगामी असल्याचा दावा कॅंटोन्मेंट प्रशासनाने केला. पुनर्वसनाकरीता दिलेली जागा ही लष्करी वाहने, तसेच वाहतुकीची वर्दळीची जागा असल्याने धंदा होणे अशक्‍य असल्याचे हातगाडी संघटनेचे कुरेशी यांनी सांगून कॅंटोन्मेंट बोर्डाच्या या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने 35 हातगाडी धारकांपैकी केवळ 10 हातगाडी धारकच या ठिकाणी भर उन्हात व्यवसाय होईल, या आशेने धंदा करीत आहे. मात्र पोट भरण्यापुरते या धंद्यातून पैसे मिळत नसल्याने हे हातगाडी धारकही नाराज आहेत.

हातगाडी धारक संघटनेच्या वतीने कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीअर धीरज मोहन यांची भेट घेणार आहे. जो पर्यंत हातगाडी धाकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जात नाही, तो पर्यंत पूर्वीच्याच ठिकाणी संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी लेखी स्वरुपाची मागणी केली जाईल, असे रफीक कुरेशी यांनी सांगितले. लवकरच ब्रिगेडिअर यांची भेटण्यासाठी वेळ घेऊन हातगाडी धारकांचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे कुरेशी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)