पुनर्वसन इमारतींमधील घुसखोरीला बसणार चाप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : रहिवाशांची माहिती करणार डिजिटलाइज
मुंबई – म्हाडा व महापालिकेकडून प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केलेल्या इमारतींमधील घुसखोरी रोखण्यासाठी सरकार सर्व रहिवाशांची माहिती डिजिटलाइज करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. डिजिटलाइज व्यासपिठामुळे पुनर्वसन केलेल्या इमारतींमध्ये कोण राहत आहेत, कुणाला घराचा ताबा मिळाला आहे, याची माहिती त्वरीत मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील नाले, रस्ते व अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांसाठी चेंबुरच्या माहुल परिसरात उभारण्यात आलेल्या 46 इमारतींमधील 200 घरांची विक्री अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तऐवज करून झाल्याबाबत शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.

याप्रकरणी कारवाईची मागणी केली असता दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व म्हाडा व महापालिकेकडून पुनर्वसन केल्या जाणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांची माहिती डिजिटलाइज करण्यात येईल, असे सांगितले.

राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी माहुलच्या इमारतींतील 200 घरांची विक्री झाली नसल्याचे स्पष्ट करीत केवळ 11 घुसखोरांनी घुसखोरी केली आहे. येथील इमारतींची महापालिकेकडून नियमित तपासणी करता येते. यातील 10 घुसखोरांना कागदपत्रांशिवाय व एकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणात 8 जणांविरोधात आरसीएफ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पाटील म्हणाले.

यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एमएमआरडीए तसेच म्हाडाच्या इमारतींतील घरांची विक्रीतही गैरव्यवहार होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुनर्वसन इमारतींतील रहिवाशांची एकत्रित माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. संक्रमण शिबिरांतील घुसखोरांबाबत सरकार धोरण ठरवत आहे. त्याचप्रमाणे ही माहिती डिजिटलाइज करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे इमारतींमध्ये कोण राहते, कुणाला घरचा ताबा मिळाला आहे. याची सर्व माहिती या डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)