पुतळ्यांचे राजकारण (अग्रलेख)

गुजरातमधील केवाडिया येथे नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या साक्षीने उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते बुधवारी अनावरण झाले. या सोहळ्यानंतर मोदी यांनी “अशा कामात राजकारण आणू नका,’ असे आवाहन केले. “पटेल यांचा पुतळा हे केवळ स्मारक नसून देशाची एकता, सन्मान व सामर्थ्याचं प्रतीक आहे. भारताच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना हे सणसणीत उत्तर आहे. पण अशा कामातही काही लोकांना राजकारण दिसते,’ याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करतानाच मोदी यांनी “देशाच्या महान सुपुत्रांचा, महापुरुषांचा गौरव करणं हा गुन्हा आहे का,’ असा सवाल विरोधकांना विशेषत: कॉंग्रेसला केला.

मोदी हे सोयीस्करपणे विसरले की सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारणे, हा भाजपच्या राजकारणाचाच एक भाग आहे. पटेल यांच्या थोरपणाबद्दल कोणालाही शंका असायचे कारण नाही. देशाचे पहिले गृहमंत्री असलेल्या पटेल यांनी देश एकजूट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. विविध संस्थांनांचे विलीनीकरण असो की हैदराबादवरील कारवाई; सरदार पटेल यांनी महत्वाचे काम केले होते. स्वातंत्र्य मिळत असताना हा देश असंख्य संस्थानांमध्ये विभागला होता. तेव्हा सरदारांनी सर्व संस्थानिकांना देशाच्या एकाच झेंड्याखाली येण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला बहुसंख्य संस्थानिकांनी अनुकूल प्रतिसाद दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पटेल यांच्या या कार्यकर्तृत्वाला साजेसा त्यांचा सन्मान केला जावा, अशी कोट्यवधी देशवासीयांची भावना होती. “त्या भावनेचा आदर राखूनच सरकारने हे भव्य स्मारक उभारण्याचं काम केले’ असल्याचा दावा, मोदी यांनी केला. या स्मारकाला “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे नाव देण्यामागे पटेल यांचे काम हेच कारण असले, तरी मोदी सरकारचे त्यामागील राजकारणही लपून राहत नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापेक्षा देशात अनेक श्रेष्ठ नेते होऊन गेले अशी भूमिका मोदी सरकारकडून गेल्या चार वर्षाच्या काळात सातत्याने घेतली जात आहे. हे स्मारक त्याच चळवळीचा एक भाग आहे, असे म्हणता येते. पटेल यांनी नेहरुंच्याच नेतृत्वाखाली काम केले होते याचा सोयीस्कर विसर संबंधितांना पडत आहे. पटेल यांच्यावर नेहमीच अन्याय झाला, अशी भावना अप्रत्यक्षपणे पसरवली जात आहे. पण स्वत: सरदार पटेल यांना तसे कधीही वाटले नव्हते.उलट “महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री असलेल्या ज्या सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता; त्यांचेच भाजप आता कौतुक करीत आहे,’ अशी टीका कॉंग्रेसकडून होत असेल, तर आता मोदी यांनी त्याला उत्तर देण्याची गरज आहे.

भाजपने सरदार पटेल यांना जवळ केल्याने कॉंग्रेस पक्ष काही प्रमाणात अडचणीत आला आहे, हे खरे असले तरी कॉंग्रेसने कधीही सरदार पटेल यांना कमी लेखलेले नाही हेही वास्तव आहे. जे काम गेल्या 60 वर्षाच्या काळात होऊ शकले नाही, ते स्मारकाचे काम मोदी सरकारने चार वर्षाच्या काळात केले अशी तुलना आता होणे क्रमप्राप्तच असले; तरी कॉंग्रेस सरकारने कधीही पुतळ्यांचे राजकारण केले नाही किंवा त्यांना त्याची गरज वाटली नाही.

मोदी सरकारची ही राजकीय गरज असल्यानेच हे पुतळे उभारण्याचे विषय समोर आले आहेत. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक असो किंवा इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असो; भाजप सरकारच्या राजकीय गरजेतूनच हे विषय पुढे आले आहेत.या महापुरुषांना मानणाऱ्या समाज घटकांना जवळ करण्यासाठी भाजपसमोर अन्य कोणताही पर्याय आणि मार्ग नसल्यानेच पुतळ्यांचे राजकारण केले जात आहे.सरदार पटेल यांच्या या स्मारकासाठी 3600 कोटी रुपये खर्च झाला आहे. या स्मारकाच्या निमित्ताने हजारो लोकांना रोजगार मिळण्याचा दावाही केला जात आहे. ते खरेही असेल. पण तरीही यामागील राजकारणाकडे दुर्लक्ष करता येत नाही. तसे पाहिले तर भारतीय राजकारणाला पुतळे नवीन नाहीत.

आदर्श पुरुषांचे काम सतत स्मरण देत रहावे, म्हणून पुतळे उभारण्यात आले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेकडो पुतळे देशात पहायला मिळतात. त्यामागे समाजाला प्रेरण मिळावी हाच उद्देश होता. पण गेल्या काही काळात या उद्देशाची जागा राजकारणाने घेतली आहे.याच किंवा अशाचप्रकारच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याने देशात दंगली होण्याचे प्रकारही घडले आहेत.अर्थात त्यामागेही राजकारण असतेच. या पार्श्‍वभूमीवरच, मोदी यांच्या पुतळ्याचे राजकारण न करण्याच्या आवाहनाकडे पहायला हवे. त्यामुळे ज्या पुतळ्याची उभारणीच शुध्द राजकारणापोटी झाली आहे, त्यामध्ये राजकारण येणे अपरिहार्य आहे. सरदार पटेल यांच्या उत्तुंग कामाची आठवण करुन देणारे तेवढेच उत्तुंग स्मारक मोदी सरकारने उभारले म्हणून त्यांचे अभिनंदन करायलच हवे. पण भविष्यात या विषयावरुन राजकारण होणार नाही अशी अपेक्षा मात्र सरकारने बाळगू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)