कथाबोध

डॉ. न. म. जोशी

अमेरिकेतील बोस्टन शहरातील गोष्ट आहे. एक मुलगा मोलमजुरी करून शाळा शिकत होता. कधीतरी तो घरोघर जाऊन काही सामान विकायचा. असाच एकदा हिंडता हिंडता त्याला खूप भूक लागली. खिशात पैसे तर नव्हते. एका घरी माल विकण्यासाठी गेला. पण तिथं असलेली तरुण स्त्री एकटीच होती. गरीब होती. तिनं काही माल घेतला नाही. तिच्याकडं काही खायला मागावं असं वाटलं. पण संकोचानं तो गरीब मुलगा म्हणाला, “बाई थोडं पाणी द्याल का प्यायला.’
त्या तरुण स्त्रीनं त्याच्या डोळ्यातली भूक ओळखली होती. ती माल घेऊ शकत नव्हती. खायला द्यायलाही तिच्याकडं काही नव्हतं. पण त्या उदार स्त्रीनं पातेल्यात जेवढं दूध होतं तेवढं सगळं एका ग्लासात भरून या गरीब मुलाला प्यायला दिलं.

तहानही भागली आणि थोडी भूकही भागली. त्या स्त्रीनं तिच्या जवळ होतं नव्हतं तेवढं सारं याला दिलं होतं. त्याचे डोळे भरून आले. तो मुलगा खूप शिकला. खूप मोठा डॉक्‍टर झाला. घरोघरी जाऊन माल विकणाऱ्या या मुलाचं नाव डॉ. हॉवर्ड केली. डॉ. हॉवर्ड केली आता प्रख्यात डॉक्‍टर झाला होता. त्याचं मोठं हॉस्पिटल होतं. गावोगावचे रुग्ण त्याच्या इस्पितळात येत.

एक म्हातारी स्त्री त्याच्या इस्पितळात दाखल झाली होती. डॉ. हॉवर्डनं तिला तपासलं. इस्पितळात दाखल केलं. तिच्यावर उत्तम उपचार केले. तिला तपासतानाच डॉ. हॉवर्डला वाटलं होतं की या स्त्रीला आपण कुठंतरी पाहिलं आहे. पण नेमकं आठवेना. खूप विचार केला. पण हॉवर्डला या स्त्रीचं नाव आठवेना. तिला कुठं पाहिली ते नेमकं स्मरेना.शेवटी त्या रुग्ण स्त्रीला इस्पितळातून डिस्चार्ज देण्याची वेळ आली. त्या स्त्रीनं तिथल्या परिचारिकेला सांगितलं…”डॉक्‍टरांना म्हणावं मला बिलात काहीतरी सूट द्या. मी एक गरीब कष्टकरी बाई आहे. तुमचं बिल मी हळूहळू फेडीन.’

परिचारिकेनं डॉक्‍टरांना सांगितलं आणि त्याचवेळी डॉक्‍टर केली यांना आठवलं की खूप वर्षांपूर्वी आपल्या खिशात पैसे नसताना याच बाईनं आपल्या घरातलं सगळं.. ग्लासभर दूध आपल्याला दिलं होतं… डॉ केली यांनी बिलाच्या कागदावर लिहून सही केली. त्यांनी लिहिलं होतं, “औषधोपचाराचं बिल एक ग्लास दूध? ते मला खूप वर्षांपूर्वीच मिळालं आहे.’ त्या गरीब स्त्रीच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिचं पुण्य फळाला आलं होतं.

      कथाबोध

माणसानं नेहमी सत्कर्म करीत राहावं. सत्कर्माची फळं केव्हा ना केव्हा मिळतातच यावर विश्‍वास वाढेल अशी ही गोष्ट आहे. आपल्याजवळ जे आहे ते आपल्यापेक्षा त्यावेळी अधिक गरज ज्याला आहे त्याला देणं यासारखे दुसरं उत्तम सत्कर्म नाही. तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, उघड्या अंगानं कुडकुडणाऱ्याला वस्त्र आणि निराधाराला आधार देणं ही माणुसकीची संस्कृती आहे. यालाच पुण्य असं म्हणतात. पुण्यासाठी देवासमोर तासन्‌तास पूजापाठ करीत बसण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. दारी आलेला याचक हाच देव आहे असं समजून तो उपाशी असेल तर त्याला पोटपूजा करण्यासाठी काहीतरी द्यावं घासातला घास काढून द्यावा. ही संवेदनशीलता म्हणजे पुण्यकर्म!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)