पुण्याला हक्‍काचे 16 टीएमसी पाणी द्यावे

कॉंग्रेसची भजन आंदोलनाद्वारे मागणी : पाणीकपात लादणाऱ्या सरकारचा जोरदार निषेध

पुणे – पुण्याला हक्‍काचे 16 टीएमसी पाणी मिळावे, या मागणीसाठी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरासमोर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी भजन आंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपच्या अकार्यक्षम कारभारामुळे नागरिकांना हक्‍काच्या 16 टीएमसी पाण्याला मुकावे लागत आहे. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही पुणेकरांना पाणीकपात लादणाऱ्या सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला. हे गणराया सिद्धी विनायका, आमच्या हक्‍काचे पाणी मिळू दे, तुला सर्व पुणेकर नमन करून विनंती करतो, हे गणराया पालकमंत्र्यांना सुबुद्धी दे, अशी पुण्याच्या पाणीटंचाईकडे लक्ष वेधणारी व पालकमंत्री गिरीश बापटांना सदबुद्धी देण्याची मागणी करणारी भजने यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गायली.

पुण्याच्या हक्‍काचे पाणी मिळण्यात पालकमंत्री बापट यांचे राजकारणच अडसर ठरत आहे. अन्य कुठल्याही भागाच्या विरोधात आम्ही नाही तर पुण्याला हक्‍काचे पाणी मिळावे हि आमची मागणी आहे. हि मागणी पूर्ण करता येत नसेल तर पालकमंत्र्यांनी आणि भाजपच्या आमदारांनी पदाचे राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना केली. यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, शांतीलाल सुरतवाला, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष सोनाली मारणे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले होते. श्री कसबा गणपतीची महाआरती करून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)