पुण्यापेक्षा मुंबईमध्ये रत्नागिरी हापूसला जास्त भाव

शेतकऱ्यांची पुण्यापेक्षा मुंबईला माल पाठविण्यास पसंती


रत्नागिरी हापूसला भाव अधिक मिळत असल्याचा परिणाम


सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यास उजडणार मे महिना

पुणे – पुण्यापेक्षा मुंबईमध्ये रत्नागिरी हापूसला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मुंबईला माल पाठविण्यास पसंती देत आहेत. परिणामी, येथील मार्केट यार्डातील फळ विभागात कमी प्रमाणात हापूस दाखल होत आहे. आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने हापूसला अधिक भाव मिळत आहे. मे महिन्यात हापूसची आवक वाढते. त्यावेळी आंब्याचे भाव घसरतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. एकंदरीत सर्वसामान्यांना रत्नागिरी हापूसची चव चाखण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूर या सर्वांत मोठ्या बाजार समित्या आहेत. मुंबई बाजारात सध्यस्थितीत दररोज 40 हजार रत्नागिरी हापूसच्या पेट्या दाखल होत आहेत. याविषयी व्यापारी युवराज काची म्हणाले, पुण्यापेक्षा मुंबईमध्ये रत्नागिरी हापूसला जास्त भाव मिळतो. साधारणपणे शेतकऱ्याला पेटीमागे 500 ते एक हजार रुपये जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी मुंबईला माल पाठविण्यास पसंती देतात. रविवारच्या दिवशी मुंबईतील बाजार हा बंद राहातो. नागपूरला माल पाठविणे शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात माल पुणे शहरात पाठविण्यात येतो. परिणामी, इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी हापूसची पुण्यात आवक जास्त असते. दररोज पुण्यात तीन ते साडेतीन हजार पेटींची आवक होते. याखेरीज, गुलटेकडी मार्केटयार्डात आंब्यासाठी पुरेशी जागा, रायपनिंग चेंबर उपलब्ध नसल्याने आवक वाढून भाव घसरतील या भीतीने शेतकरी माल पाठविण्यास धजावत नाही. त्यामुळे, या सर्व गोष्टींचा परिणाम व्यापारावर होण्याच्या शक्‍यतेने शेतकरी मुंबईकडे वळाल्याचे दिसून येते; तर दुसरीकडे गुजरात, अहमदाबाद येथूनही आंब्याला चांगली मागणी आहे. तिकडेही माल पाठविला जातो. त्यामुळे पुण्यात आंब्याची आवक कमी होत आहे. त्यातच तयार मालाची अनुपलब्धता आणि आवाक्‍याबाहेर असलेले भाव यामुळे पुणेकरांना इच्छा असूनही हापूसची चव चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही काची यांनी नमूद केले.

आवक वाढली नसल्याने भाव तेजीत
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कच्च्या हापूसच्या 4 ते 7 डझनांच्या पेटीला 1500 ते 4500 भाव मिळत आहे. तर तयार 4 ते 7 डझनांच्या पेटीला 2000 ते 4000 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारातील तयार हापूसच्या डझनासाठी 500 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत. दरवर्षी 15 एप्रिलनंतर हापूसचे भाव उतरण्यास सुरुवात होत असते. या काळात घाऊक बाजारातील डझनाचे भाव 300 ते 350 रुपयांपर्यंत येत असतात. मात्र, यावर्षी आवक वाढली नसल्याने भाव तेजीत आहेत. हा भाव सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने, आणखी काही  काळ वाट पाहावी लागणार आहे. 1 मेपर्यंत चांगली आवक वाढणार आहे. त्यावेळी भाव सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी वर्तविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)