पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप

रेल्वेला महापालिकेने सदर होर्डिंग काढण्यासाठी 2013 पासून वारंवार दिले पत्र

पुणे: पुण्यातील जुना बाजार येथील अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग कोसळून नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी असून त्यातील तीन जण अत्यवस्थ असल्याचे समजत आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

अमर शेख चौकातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एका ठेकेदाराला (नाव समजू शकलेले नाही) सांगण्यात आले होते. हे होर्डिंग काढत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळले. यामध्ये पाच रिक्षांचा समावेश आहे. हे होर्डिंग काढण्यासाठी रेल्वेला महापालिकेने 2013 पासून वारंवार पत्र दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महापालिकेने केला आहे. होर्डिंग काढताना थेट मागील सपोर्ट काढल्याने पूर्ण होर्डिंग कोसळून अपघात झाला. या ठिकाणी 40 बाय 20 या मापाच्या सर्वात मोठ्या होर्डिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र या होर्डिंगने सर्व नियम तोडत दिलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी मोठे होर्डिंग लावण्यात आले होते, असे, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त विजय दहीभाते यांनी सांगितले.

 

कोसळलेले होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याने त्या घटनेशी पालिकेचा काहीही संबंध नसल्याचे म्हणत महापालिकेने हात वर केले आहेत. तर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)