पुण्यात पाणीकपात अटळ

दर दहा-पंधरा दिवसानंतर एक दिवस पाणी पुरवठा बंद  
यंदा 20 टक्‍के साठा कमी, पाणीकपात करावीच लागणार : पालकमंत्री गिरीश बापट बापट

 
पुणे – दर दहा-पंधरा दिवसांनी पाणीबंद ठेवून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी समर्थन केले आहे. धरणात असलेला पाणीसाठा पाहता पाणीकपात करावीच लागणार आहे याचा पुनरुच्चार बापट यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

मेट्रो, पीएमआरडीए, चोवीसतास पाणी पुरवठा, रस्ते, दलित वस्ती सुधारणा अशा अनेक विषयांबाबत दर तीन महिन्यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी येतच असतो. त्यामध्ये पाण्याविषयी चर्चा झाल्याचा खुलासा बापट यांनी केला. मात्र गेल्या महिन्यापासून विविध कारणे काढून पाणीबंद ठेवण्यात येतच आहे. त्यामुळे हा कपातीचाच भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

यंदा धरणात मागीलवर्षीपेक्षा 20 टक्के पाणी कमी आहे. पर्वती ते लष्कर बंद लाईन कार्यान्वित झाल्यामुळे 60 ते 100 एमएलडी पाणी वाचेल. शेती आणि शहराला काटकसरीने पाणी वापरले तरच मे पासूनचे पुढील ऑगस्ट पर्यंतचे महिने पाणी पुरणार आहे, असे बापट म्हणाले.

सगळ्या आमदारांशी बोलणे झाले आहे. सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी बोलून ठरवावे लागणार आहे. पाण्याबाबत राजकारण करू नये. दहा दिवसातून एकदा पाणी बंद ठेवले तर त्याची बचत होईल, असे बापट यांनी स्पष्ट केले. बेकायदेशीर नळजोडांवरही कारवाई करण्यात येणार असून, बांधकामांनाही पाण्याबाबत सूचना द्याव्या लागणार आहेत, असे बापट म्हणाले.

बेबी कॅनॉलची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने तो काही दिवस बंद ठेवावा लागणार आहे. त्यामध्ये कचरा झाला आहे. काही जणांनी वहिवाटीसाठी कॅनॉलचा काहीभाग खणला आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 15-20 कोटी रुपये राज्यसरकारकडून दिले आहेत, असे बापट यांनी यावेळी केला. कॅनॉलमधून सोडलेले पाणी साठवण तलावातही साठवले जाते. केवळ शेतीसाठी नव्हे तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेसाठीही जाते, त्यामुळे ते पाणी ऑगस्टपर्यंत पुरवावे लागणार असल्याचे, बापट म्हणाले.

…अन्यथा पाणीकपात अटळच
महापालिकेतही पाण्यावर चर्चा झाली. लोकसंख्येनुसार पाणी देण्याचा विषय आयुक्तांच्या ऍन्टीचेंबरमध्ये चर्चिला गेला. लोकसंख्येचा विचार केला असता. वार्षिक 8.50 टीएमसीच पाणी मिळू शकते. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे अपील केले आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आता पाणी कमी करू नये, असे महापालिकेने जलसंपदा अधिकाऱ्यांना सांगितले. जर आताच पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही, तर पुढे पाणी कपात करावीच लागणार असे जलसंपदा अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

पाणी वाटपाचा अधिकार जलसंपदाचा
कालवा समिती, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना काहीच म्हणणे मांडता येणार नाही. निर्णयप्रक्रियेतही त्यांना काहीच “रोल’ नसल्यामुळे ते केवळ उपचारापुरते राहणार आहेत, असे जलसंपदा विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहेत. याबद्दल बापट म्हणाले “असे होणार नाही. आम्हांला ते बोलावतीलच. प्रत्येक गोष्टीत चर्चेतून मार्ग निघतो. वास्तविक पाणी वाटपाचा अधिकार जलसंपदा विभागालाच आहे,’ असेही बापट यांनी मान्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)