पुण्यात न विकले गेलेले 36 हजार फ्लॅटस्‌

आणखी तीन महिन्यांनंतर विक्रीला वेग येण्याची शक्‍यता

पुणे – घर खरेदी करणारे आणखीन वाट पाहण्याच्या मनस्थितीतून बाहेर पडलेले दिसत नाहीत, त्यामुळे देशातील मोठ्या शहरात न विकल्या गेलेल्या फ्लॅटची संख्या अजूनही 4.4 लाख इतकी आहे. त्यात पुण्यातील 36 हजार फ्लॅट्‌चा समावेश आहे, अशी माहिती जेएलएल इंडिया या संस्थेने दिली आहे.

ही आकडेवारी 2017 च्या अखेरची आहे. यामुळे घराचे दर स्थिरावतील आणि 2018 च्या दुसऱ्या सहामाहीपासून घर विक्रीला वेग येण्याची शक्‍यता असल्याचे जेएलएल इंडियाला वाटते. विक्रीविना पडून असलेल्या फ्लॅटची संख्या सर्वात जास्त दिल्ली एनसीआरमध्ये आहे. तेथे 1.5 लाख इतके फ्लॅट पडून आहेत. 4.4 लाख पैकी 34,700 इतके बांधून पूर्ण झालेले आणि राहायला जाण्यासाठी तयार आहेत. तर बाकी निर्मितीच्या विविध टप्प्यावर आहेत.

चेन्नईत राहाण्यासाठी तयार असलेल्या एकूण फ्लॅटस्‌पैकी 20 टक्‍के फ्लॅट पडून आहेत. कोलकात्यात असे केवळ 26 हजार फ्लॅटस्‌ असून हे प्रमाण इतर शहराच्या तुलनेत कमी आहे. जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले की, देशात गेल्या दोन वर्षात आर्थिक आणि रिअल इस्टेटच्या अनुषंगाने अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी घरांची खरेदी काही काळापासून थांबविली आहे. आता त्या वातावरणाचा परिणाम कमी झाला आहे. त्यामुळे हळूहळू फ्लॅट विक्रीला वेग येण्याची शक्‍यता आहे. 2018 च्या दुसऱ्या सहामाहीत स्थिती पुर्ववत होण्याची शक्‍यता त्यांना वाटते.

नायर म्हणाले की नोटाबंदी, जीएसटी आणि रेराचा या क्षेत्रावर एकत्रित परिणाम झाला आहे. त्यामुळे नव्या योजनांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अगोदरच्या योजनातील घरे विकली गेलेली नाहीत. त्यामुळे सर्व शहरात आता घरांचे दर स्थिरावले असल्याचे दिसून येत आहे. काही शहरात विकसकांनी सवलती देऊन घराचे अप्रत्यक्षरित्या दर कमी केले असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत 86 हजार, बंगळूरुत 70 हजार तर हैदराबादेत 28 हजार फ्लॅट तयार आहेत. आता जे फ्लॅट तयार असतील किंवा लवकर तयार होणार असतील ते खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)