पुण्यात दोन तास मुसळधार; राज्यभरातही पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र : थंडी ओसरली


स्वेटर घालायचा, की रेनकोट?

पुणे – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुण्यातही मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते सक्रिय झाल्याने राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. सोमवारी रात्रीपासूनच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी तर वादळी पाऊस झाला. पुण्यातही सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तब्बल दोन तास पाऊस पडत होता. यामुळे हवेत गारवा वाढला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत अशीच स्थिती होती. त्यानंतर ढगाळ वातावरण जावून थोडे ऊन पडले व त्यानंतर ही दिवसभर ढगाळ वातावरणच होते.

पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडाली. सकाळी कामावर जाणाऱ्यांना घरातून बाहेर पडताना स्वेटर घालायचा की रेनकोट? असा प्रश्‍न पडला होता. कात्रज,कोथरूड,हडपसर,वाघोली याभागात जोरदार पाऊस झाला तर शहराच्या मध्यवस्तीमध्ये मात्र पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पुणे शहराबरोबर जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी पाऊस झाला. यात खेडशिवापूर, भोर, वेल्हे या भागात चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर उरूळी कांचनमध्येही जोरदार सरी झाल्या. या पावसाने रब्बीच्या पिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र ऊस आणि द्राक्षासाठी हा पाऊस अडचणीचा ठरण्याची शक्‍यता आहे.

मराठवाडा, विदर्भात शक्‍यता
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे. बंगालच्या उपसागरातसुद्धा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीव्रता वाढली तर मराठवाडा आणि विदर्भात ही पुन्हा पावसाला सुरूवात होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)