पुण्यात दर गुरूवारी अघोषित पाणीबंदी

दुरुस्तीच्या नावाखाली  प्रशासनाची शक्कल

पुणे – दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरूवारी महापालिकेकडून पाणी बंद करण्यात येणार आहे. या आधीही तीन आठवड्यांपासून पाणीबंद ठेवले जात आहे. पाणीकपातीचाच हा प्रकार असून, यामुळे आठवड्यातून दोन दिवस पुणेकरांना पाणी मिळणार नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापलिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या तीन आठवड्यापासून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी बंद करण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्ती आणि विद्युत विषयक कामांच्या दुरुस्तीचे कारण यासाठी पुढे केले जात आहे.

पुणे शहरामध्ये दर गुरुवारी विद्युत विषयक आवश्‍यक कामे करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात शहरामध्ये कोठे दुरुस्ती करण्यात आली. जलवाहिन्यांची दुरुस्ती कोणत्या ठिकाणी झाली, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नेमकी ही दुरुस्ती आहे, की पाणीकपात याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यामध्ये धरणातून पाणी उचलण्यावरून सध्या जोरात वाद सुरू आहे. त्या वादावर मागील आठवड्यात तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. पाणी उचलण्यावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात झालेल्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यामध्ये धरणातील जलसाठ्याचा विचार करून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे ठरवण्यात आले.

जलसंपदा विभाग महापालिकेला केवळ दररोज 1,150 एमएलडी पाणी देण्यास तयार आहे. महापालिकेला शहराची गरज लक्षात घेता 1,350 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. या वादामुळे जलसंपदा विभागाकडून शहराचे तीन वेळा पाणी तोडण्यात आले होते. या सगळ्यावर उपाय म्हणून महापालिकेने दर दिवसाआड पाणी देण्यापेक्षा किंवा एकवेळ पाणी देण्यापेक्षा दुरुस्तीच्या नावाखाली गुरूवारी पाणी बंद आणि शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा असा नामी उपाय शोधला आहे.

दर गुरूवारी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यानंतर महिन्याला सुमारे पाच हजार 400 एमएलडी पाण्याची बचत होईल. त्यामुळे दररोज 200 एमएलडी पाणी कमी करण्याचे धोरण राबवता येणार आहे. मात्र पालिकांनी हा युक्तीवाद चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

महापालिका आयुक्त म्हणतात…
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून काहीवेळा गुरूवारीच देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. त्याचकाळात जलवाहिन्यांची दुरुस्ती करता येते. त्यामुळे ती गुरूवारी नियोजित केलेले जाते. यासाठी त्यादिवशी पाणी पुरवठा बंद ठेवावा लागतो, असा खुलासा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला. मात्र, “दुरुस्तीला किती दिवस लागतील, किती दिवस असेच गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार,’ याचे उतर मात्र राव देऊ शकले नाहीत.

महावितरणकडून पर्वती जलकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद गुरुवारी (दि.24 )करण्यात आलेला नाही. गुरुवारी लघु वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येतो. जलकेंद्राला स्वतंत्र वीज पुरवठा असल्यामुळे वीज खंडीत होत नाही.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)