पुण्यात कमळाचा ‘हात’ कुणाला?

पुणे – युती, त्यासाठी होणाऱ्या बैठका, नेत्यांचे एकमेकांवर होणारे आरोप, प्रत्यारोप, केंद्रीय स्तरावर दररोज होणाऱ्या नवनवीन घोषणा, या सर्वांमुळे निवडणुका आता लवकरच येउ घातल्या आहेत, हे सुज्ञ मतदाराला आता कळू लागले आहे. पुण्यातही निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या असून आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्या पुण्यामध्ये आठही विधानसभांच्या जागांवर भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहेत, खासदारही भारतीय जनता पार्टीचाच आहे. मात्र लोकसभेच्या एका जागेसाठी भारतीय जनता पार्टी अंतर्गतच आतापासून काही जणांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नाराजांची संख्या मोठी आहे. पक्षाचे काम बारा बारा वर्षांपासून करत असूनही पदरी साधे नगरसेवक पदही न पडलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी मुंबईच्या वाऱ्या, जमल्यास दिल्लीच्या वाऱ्या करून, उमेदवारीसाठी प्रत्येक महनीयांचे उंबरे झीजवलेल्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. या सगळ्या नाराजांची मोट एकत्र बांधून पक्षांतर्गत एक मोठे आव्हानच उभे करण्याची तयारी देखील आस्ते कदम सुरू आहे.

आम्ही इथे काय करायचे आणि काही नाही, याचे निर्णय जर दिल्ली आणि मुंबईहून होणार असतील, तर आम्हाला कोणतेही पद मिळून काय उपयोग, असे उद्वेगाने बोलणारे काही पदाधिकारी, आम्ही केवळ नावालाच उरलोय, असे म्हणत आपल्या मनातील खदखदीला वाट करून देत आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर येणारी लोकसभा किंवा विधानसभा दोन्हीही निवडणुका भाजपाला जड जाण्याचीच जास्त शक्‍यता आहे. विद्यमान पुण्यात थांबत नाहीत, आहेत त्यांचा उपयोग नाही, पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही, मुलभूत प्रश्‍न जैसे थे, केंद्रात पंतप्रधान मोठमोठ्या घोषणा, आश्‍वासने देत सुटलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुण्यापुरते बोलायचे झाले तर, आता मतदारांना हे कळून चुकले आहे की, निवडणुका आल्या की नवीन घोषणा होतात, अच्छे दिन फक्‍त निवडणुकीपूर्वीच येतात, निवडणूका संपल्या की अच्छे दिन शोधायची पाळी येते. त्यामुळे मतदारांना आता गृहीत धरता येणार नाही, हेच पाच राज्यातील निवडणुकानंतर स्पष्ट झालेले आहे.

त्यातून बोध घेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा, निर्णय जाहीर करण्याचा सपाटाच लावलेला आहे. मात्र मागील साडेचार वर्षांत काय दिवे लावले याची उत्तरे आम्हाला स्थानिक पातळीवर द्यावी लागतील, तीही मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगावीत, असेही कार्यकर्ते बोलत आहेत.

भाजपाअंतर्गतच एवढी धुमस आहे की, आता पक्षाने तिकीट नाकारले तर दूसऱ्या पक्षात जाउन तिकीट मिळवून निवडणूक जिंकून दाखवेन, अशी भाषा कार्यकर्ते बोलत आहेत. लोकसभेसाठी तिकीट कुणाला मिळावे, आणि कुणाला मिळाले तर काय होईल, याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपाचे सर्वात ज्येष्ठ आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री आता खासदारकीच्या रिंगणात असतील, तर त्यांच्या केंद्रात जाण्यामुळे रिकाम्या होणाऱ्या विधानसभेच्या जागेसाठी आतापासूनच फिल्डींगा लागू लागल्या आहेत. पुण्याच्या प्रथम नागरिकाचा अर्थात मान मोठा आहे. हे गणित जुळले, तर बाकीच्यांचे काय, या विषयावर चर्चा झडू लागल्या आहेत.

भाजपा, सेना युतीची लुटपुटुची लढाई नेहमीसारखी सुरूच असली तरी, सत्तेच्या गडासमोर विनाअट तहाची बोलणी आज ना उद्या होणारच आहेत. हा पुर्वेतिहास आहे. त्यामुळे तसे जर झाले, तर भाजपाच्या जागांचा प्रश्‍न अधिकच बिकट होउ शकतो. नाराजांची संख्या अधिकच वाढू शकते. त्यातही पुन्हा काही पक्षांकडे लोकसभा, विधानसभेसाठी चेहरे देखील नाहीत. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांना हे इतर पक्ष जवळचे वाटू शकतात. अशा परिस्थितीमधून सर्वांना सोबत घेउन वाटचाल करण्याचे प्रमुख काम यापुढे पुण्याच्या भाजपा नेतृत्वाला करावे लागेल. म्हणूनच आता कोणते कमळ हात मिळवणी करणार, हे येणाऱ्या काही काळातच स्पष्ट होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)