पुण्यातील शिवसेनेमध्ये नेतृत्त्वाची पोकळी

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची कबूली

पुणे – पुणे शहर शिवसेनेमध्ये नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली आहे, अशी कबूली खुद्द जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. आगामी काळात आपण पुणे शहरात लक्ष घालणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. रविवारी ते मार्केट यार्डात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवतारे म्हणाले की, मुंबईप्रमाणेच पुणे शहराची वाढ गतीने होत आहे. या शहराची हद्ददेखील सर्वात मोठी आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नवे पुणे निर्माण व्हावे, यासाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून शहराच्या विकासाचे नियोजन केले पाहिजे. पुण्यात शिवसेनेचे नेते आले की, त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. परंतु, तिच गर्दी स्थानिक पातळीवरील नेत्यांसाठी होत नाही. कारण, स्थानिक नेतृत्व तेवढे सक्षम नाही. नागरिकांना प्रश्‍न कोणाकडे घेऊन जावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे शहरासाठी पक्षाकडून बाहेरील नेत्यांची निवड झाल्यानंतर त्याबद्दल नागरिकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण होते. या आधीच्या नियोजनकर्त्यांनी त्यांचा विचारच केला नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला. त्यामुळे कचरा, पाणी, वाहतूक यांसारखे प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यांनी वेळीच नियोजन केले असते, तर हे प्रश्‍न उभे राहिले नसते असेही शिवतरे म्हणाले.

नियोजन नसल्यामुळेच ही परिस्थिती झाली आहे. आता तेच रस्त्यावरील खड्डे असो की अन्य कोणताही प्रश्‍न दाखविण्यासाठी सेल्फी काढतात, असे खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेतला शिवतारे यांनी टीका केली. पुणे अथवा बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाकडून आदेश आला तर, त्यांचे पालन करू. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पालन केले जाईल.

400 एकरमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय बाजार
आंतराष्ट्रीय दर्जाचा बाजार उभा करण्यासाठी पुरंदर तालुक्‍यातील दिवे परिसरात 400 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना दोन महिन्यांत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. येत्या महिन्याभरात त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर होईल, असे शिवतारे यांनी सांगितले. सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशी हे बाजारपेठ आहे. यामध्ये वीज, पाणी, शीतगृह यांसह सर्व अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल. शहरातील वाहतुकीची कोंडीदेखील त्यामुळे सुटण्यास मदत होईल. प्रस्तावित विमानतळापासून काही अंतरावर हा बाजार होणार असल्यामुळे देशात कुठेही शेतीमाल पाठविणे शक्‍य होणार असल्याचेही शिवतारे यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)