पुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा छापा

पुणे,दि.12- पुण्यातील नाईट लाईफसाठी प्रसिध्द असलेल्या पंच तारांकीत हॉटेल, क्‍लब आणी हुक्का पार्लरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 12 नामांकित पंचतारांकित हॉटेल, क्‍लब आणि हुका पार्लरमध्ये शनिवारी रात्री छापे टाकले . ही कारवाई रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये या हॉटेल्सवर विविध कलमांअंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. के .व्यंकटेशन यांनी सूत्रे स्विकारल्यावर सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला होता. यामध्ये पुण्यातील नाईट लाईफमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी व सूचना प्राप्त झाल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले होते. गुन्हे शाखेने बॉम्बे पोलीस ऍक्‍ट अंतर्गत मॅक्‍लारेन पब,डेली ऑल डे, द बार स्टॉक,मियामी, जे डब्ल्यू मेरियेट हॉटेल चतुश्रुंगी, नाईट रायडर, नाईट स्काय, वेस्टइन, पेन्टहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाऊन्ज आणि ब्ल्यू शॅकवर कारवाई केली आहे .यातील बरेचसे हॉटेल्स हे नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहेत. जेव्हा कारवाई झाली तेव्हा या हॉटेलांमध्ये 5-8 हजार तरूण तरूणी उपस्थित होते. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, भागूप्रताप बर्गे तसेच पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.

-Ads-

चौकट : कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर या परिसरामध्ये पब आणी बारचे मोठे प्रमाण आहे. तर शहरात शिक्षण व नोकरीनिमीत्त मोठ्या प्रमाणात परगाव व परराज्यातील तरुण वर्ग रहातो. हा तरुण वर्ग शनिवार व रविवारी पंचतारांकीत हॉटेलमधील पब्ज, क्‍लब आणी हुक्का पार्लरकडे धाव घेत असतो. अगदी पहाटे पाच पर्यंत येथे तरुणाईची वर्दळ असते. शनिवार व रविवार तर कोरेगाव पार्क व कल्याणीनगर येथे रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झालेली दिसते. यातच रात्री अपरात्री तोकड्या कपड्यातील झिंगलेल्या तरुणींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण झालेला असतो. या परिसरामध्ये अनेकदा तरुण-तरुणींच्या ग्रुपमध्ये वाद व त्याचे पर्यवसन मारामारीपर्यंत गेलेले दिसते. तर नशेत रॅश ड्रायव्हिंग करण्याऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई महत्वाची ठरत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)