पुण्यातील दलालांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क

उझबेकिस्तान व्हाया नेपाळ ते पुणे प्रवास : बॉलिवूड, मालिकांतील अभिनेत्रीही होतात उपलब्ध
“ओव्हर स्टे’साठी विना व्हिसा परदेशी तरुणींची आयात
दलालांची मोठी पोहोच असणाऱ्या तरुणींवर कारवाईस टाळाटाळ

संजय कडू
पुणे – पुणे शहरात हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचा मोठा बोलबाला आहे. बॉलिवूडमधील साईड ऍक्‍ट्रेस, मॉडेल तसेच मालिकांतील अभिनेत्रीही सहजा सहजी शहरात उपलब्ध होतात. मात्र यासोबतच परदेशातील तरुणींही दलालांकडून उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये रशिया, उझबेकिस्तान, थायलंड, येमेन देशातील तरुणींची संख्या मोठी आहे. आजवर रितसर टुरिस्ट व्हिसावर येऊन दलालांमार्फत व्यवसाय करणाऱ्या तरुणी आढळत होत्या. त्यांच्या व्हिसाच्या मुदतीची एफआरओ ब्रॅचकडे नोंद असते. यामुळे ओव्हर स्टे केल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. या कारवाईतून पळवाट काढण्यासाठी विना व्हिसा परदेशी तरुणीही भारतात आणले जात आहेत. यामुळे अशा तरुणींची एफआरओ ब्रॅंचकडे कोणतीही नोंद राहात नाही. कोणत्याही देशात विना व्हिसा परदेशी नागरिकांना प्रवेश करता येत नाही. मात्र नेपाळ व भारताची सीमा खुली आहे. ही बाब लक्षात घेऊन उझबेकिस्तानी तरुणींना काही दलाल नेपाळमार्गे पुण्यात आणत आहेत. यानंतर त्यांना बेकायदा वास्तव्य करायला लावून व्यवसाय करून घेतला जातो.

एफआरओ विभागाची कारवाई
विषय 2017 2018(1 जानेवारी 2018 ते आजवर)
1) लिव्ह इंडिया नोटीस 34 07
2) डिपोर्ट 45 22
3) ब्लॅक लिस्ट 139 67

पुणे शहरात परदेशी नागरिक शिक्षण, व्यवसाय, तसेच पर्यटन अशा कारणांसाठी येतात. शिक्षणासाठी येणारे तरुण एज्युकेशन व्हिसावर वास्तव्य करतात. यामध्ये येमेन, अफगाणिस्तान, नायजेरीया आणि आफ्रिकन देशातील तरुणांची संख्या मोठी आहे. यातील काही आफ्रिकन देशांतील तरुण एज्युकेशन व्हिसावर दाखल झाल्यानंतर ड्रग्जचा व्यवसाय करताना दिसतात. विशेषत: महागडे ड्रग्ज त्यांच्याकडून विकले जाते. कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, कोंढवा आदी परिसरात त्यांचे वास्तव्य मोठे आहे; तर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, रांजणगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे या कंपन्यांची अधिकारी व्यवसायानिमित्त बिझनेस व्हिसावर शहरात दाखल होतात. बिझनेस व्हिसावर दाखल झालेल्यांकडून गैरकृत्य झाल्याचे अद्यापही उघड झालेले नाही. मात्र टुरिस्ट व्हिसावर येऊन वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या परदेशी तरुणींचे प्रमाण मोठे आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ओव्हर स्टे करून त्या व्यवसाय करताना काही कारवायांमध्ये आढळल्या आहेत. त्यांच्या व्हिसाची नोंद एफआरओमध्ये असल्याने मुदत संपल्यानंतर अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना डिपोर्ट केले जाते. गैरकृत्यामध्ये आढळलेल्यांना ब्लॅक लिस्ट केले जाते. मात्र यावर दलालांनी पर्याय म्हणून परदेशी तरुणींना विना व्हिसा थेट पुण्यात आणण्याचे सत्र अवलंबले आहे. यामुळे एफआरओ ब्रॅंचकडे त्यांची नोंद होण्याचा प्रश्‍नच येत नाही. यातच काही दलालांची पोहोच मोठी असल्याने अशा बेकायदा वास्तव करणाऱ्या तरुणींवर कारवाई होत नाही.

पुण्यातील दलालांचे स्ट्रॉंग नेटवर्क
परदेशी तरुणींना व्यवसायासाठी परदेशातून थेट पुण्यात आणले जात आहे. आजवर दिल्ली, मुंबई येथून त्यांना काही दिवसांसाठी आणले जात होते. यामुळे पुण्यातील दलालांच्या स्ट्रॉंग नेटवर्कची चर्चा खुद्द काही बडे अधिकारीच करत आहेत. परदेशातील दलालांशी संपर्क साधून त्यांना थेट पुण्यात आणले जाते. यामुळे सामाजीक सुरक्षा विभागाच्या नेटवर्कवर प्रश्‍नचिन्ह उभे राहात आहे.

परदेशी नागरिकांवर वॉच
पुणे पोलिसांच्या एफआरओ ब्रॅंच सातत्याने बेकायदा वास्तव्य व गुन्हेगारी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर वॉच ठेवत असते. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना डिपोर्ट केले जाते किंवा ब्लॅक लिस्ट केले जाते. वेश्‍याव्यवसायातील काही परदेशी तरुणींना ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. यामुळे त्यांना पुन्हा भारतात येण्याचा व्हिसा काही वर्षे तरी मिळणार नाही.

तुमच्या प्रतिक्रियासाठी
sanjaykadu@eprabhat.com


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)