पुण्यातील खेळाचे वातवरण बघून भारावून गेलो- सुशीलकुमार

पुणे: उदयोन्मुख खेळाडूंचा अवर्णनीय उत्साह, स्पर्धेसाठी करण्यात आलेली तयारी पाहता खेलो इंडिया महोत्सव म्हणजे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेस उपस्थित राहिल्याचाच मला भास होत आहे, असे ऑलिंपिक रौप्य व ब्रॉंझपदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने सांगितले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडियामधील वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विजेत्यांना सुशीलकुमार याच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, खरेच मी येथे आल्यानंतर खूप भारावून गेलो आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

येथील उत्साहवर्धक वातावरण पाहता हा उद्देश निश्‍चित सफल होणार आहे. तो पुढे म्हणाला, केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी मनापासून आभार मानतो. येथे आल्यानंतर नवोदित खेळाडूंशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो. आमच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंपासून त्यांनी स्फूर्ति घेऊन देशाचा नावलौकिक उंचावला पाहिजे. खेलो इंडिया स्पर्धेत चमक दाखविणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिकपटू निर्माण होतील अशी मला खात्री आहे. ऑलिंपिक पदक मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने खूप मेहनत केली पाहिजे. ऑलिंपिक पदक मिळविण्यासाठी खूप कष्ट व त्याग करावा लागतो. माझ्या यशाचे श्रेय माझे गुरु सतपालसिंग यांना द्यावे लागेल. त्यांच्यामुळेच मी ऑलिंपिक पदकापर्यंत पोहोचलो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टोकियो येथील 2020 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पधेबाबत विचारले असता सुशीलकुमार म्हणाला, ऑलिंपिक पदकाची हॅटट्रिक करण्याचे माझे ध्येय आहे. टोकियो येथे सुवर्णपदक मिळविण्याच्यादृष्टीने मी भरपूर सराव करीत आहे. मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार आहेत. तेथूनच खऱ्याअर्थाने माझी ऑलिंपिकची तयारी सुरू होणार आहे.
तंदुरुस्तीबाबत सुशीलकुमार म्हणाला, मी शंभर टक्के तंदुरुस्त आहे. टोकियो येथे होणा-या ऑलिंपिकपर्यंत ही तंदुरुस्ती टिकविण्याबाबत मी योग्य ती काळजी घेत आहे. त्यादृष्टीने पोषक आहार व पूरक व्यायाम याबाबत मी वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहे.


जिम्नॉस्टिक्‍समध्ये आणखी पदकांची आशा

व्हॉल्टमध्ये महाराष्ट्राच्या गरिश्‍मा शर्मा व सोहम नाईक यांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान घेतले आहे. या प्रकारात पश्‍चिम बंगालच्या खेळाडूंबरोबर त्यांना पदकासाठी लढत द्यावी लागणार आहे. मंगळवारी महाराष्ट्राला पदकांची कमाई करुन देणाजया रिद्धी व सिद्धी हत्तेकर यांनी ऍपेरेटस व असमांतर बार या वैयक्तिक विभागातही अंतिम फेरी गाठली आहे. ऍपेरेटसमध्ये रिद्धी हिने पात्रता फेरीत अव्वल क्रमांक घेतला असून तिने सुवर्णपदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत. पूर्वा किरवे हिनेदेखील याच प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिद्धी हिने असमांतर बार प्रकारात प्रथम क्रमांकाने अंतिम फेरी गाठली आहे. या प्रकारात तिची सहकारी मयूरी आरे हिने द्वितीय क्रमांकाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलांमध्ये श्रेयस मंडलिक व महेश गाढवे यांनी ऍपेरेटस प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी पात्रता फेरीत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान घेतले आहे. याच दोन खेळाडूंनी पॉमेल हॉर्स प्रकारातही अंतिम फेरी गाठली व पदकाच्या संधी निर्माण केल्या आहेत. पात्रता फेरीत श्रेयस हा अव्वल स्थानावर असून महेश पाचव्या स्थानावर होता. रिंग्ज प्रकारात त्यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान घेत अंतिम फेरी गाठली. महेशने व्हॉल्टमध्ये सातव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली आहे.याच दोन खेळाडूंनी हाय बार प्रकारातही पदकाच्या फेरीत स्थान घेत अपराजित्व राखले आहे. त्याच्यापाठोपाठ चैतन्य देशमुख याने स्थान घेत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंना सर्वच प्रकारात दिल्ली व उत्तरप्रदेशच्या खेळाडूंचे आव्हान आहे.


क्रीडा क्षेत्रात प्रतिमा स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य – नवीन अगरवाल

नाडाच्या सरसंचालकांचे प्रतिपादन

उत्तेजक सेवन करणे हा क्रीडा क्षेत्रासाठी काळिमा आहे. त्यामुळेच उत्तेजकाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी खेळाडू व यांच्या प्रशिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्‍यकता आहे, असे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) चे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.

केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पुण्यातील महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडियात सहभागी झालेल्या खेळाडू व प्रशिक्षकांसाठी अगरवाल यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास 400 हून अधिक खेळाडू उपस्थित होते. या महोत्सवात नाडातर्फे खेळाडूंची कसून उत्तेजक तपासणी केली जाणार आहे.
नवीन अगरवाल म्हणाले, जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी अनेक खेळाडू उत्तेजकचा झटपट मार्ग स्वीकारतात. मात्र, त्यामध्ये ते दोषी आढळल्यानंतर खेळाडूंवर कठोर कारवाई होते. कधी कधी त्यांच्यावर तहहयात बंदीची कारवाई झाल्यास त्यांचे क्रीडा क्षेत्रातील करिअरच संपुष्टात येते. हे लक्षात घेऊनच खेळाडूंनी उत्तेजकाच्या आहारी जाऊ नये. आपल्या देशातही अनेक क्रीडा प्रकारांच्या सबज्युनिअर गटाच्या स्पर्धांपासून अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू दोषी ठरण्याच्या घटना दिसून येतात. याबाबत खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)