आणखी सहा मार्गांवर मेट्रोचा “पीएमआरडीए’ला प्रस्ताव
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर केलेल्या “सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (सीएमपी) शहरात सुमारे 195 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे दोन आणि “पीएमआरडीए’चा एक अशा तीन मार्गांव्यतिरिक्त नव्याने सहा मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात मेट्रोचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.
“पीएमआरडीए’ने 7 हजार 200 चौरस किलोमीटर हद्दीचा “सर्वंकष वाहतूक आराखडा’तयार करण्याचे काम “एल अॅन्ड टी’ कंपनीला दिले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा तयार करून “पीएमआरडीए’ला सादर केला आहे. तर वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी सुमारे 66 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पांचाही समावेश आहे. पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम हाती घेतले आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम “पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यात या मार्गांचे विस्तारीकरणाबरोबरच नव्याने सहा मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे मार्ग दोन टप्प्यांत उभारण्याचे नियोजन असून 2038 पर्यंत ते पूर्ण करण्याची शिफारस या अहवाल करण्यात आली आहे.
प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगरपाठोपाठ आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोणत्या मार्गावर हे प्रकल्प राबविता येतील, या संदर्भातील पूर्वसुसाध्यता (प्री-फिजीबिलिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो या कंपनीला काम दिले होते.
मात्र, प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा. त्यानंतर मेट्रोचे जाळे निश्चित करावे, असे दिल्ली मेट्रोकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार “पीएमआरडीए’ने “सीएमपी’ तयार करून घेतला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील या अहवालात 195 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी 9 मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
एल अॅन्ड टी कंपनीने पहिल्या टप्प्यातील दोन हजार चौरस मीटर परिसराचा अभ्यास करून सर्वंकष वाहतूक आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये मेट्रोचे नवीन मार्ग प्रस्तावित केले आहेत. या अहवालास प्राधिकरणाच्या मुख्य समितीने आणि मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने देखील तत्वत: मान्यता दिली आहे.
किरण गित्ते, आयुक्त, “पीएमआरडीए’
प्रस्तावित करण्यात आलेले मार्ग
1) निगडी ते कात्रज
2) चांदणी चौक ते वाघोली
3) हिंजवडी ते शिवाजीनगर
4) शिवाजीनगर ते हडपसर
5 ) हिंजवडी ते चाकण
6) सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट
7) वारजे ते स्वारगेट
8) वाघोली-पवार वस्ती ते हिंजवडी
9) चांदणीचौक ते हिंजवडी
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा