पुण्याचे बकालीकरण थांबवा हो…!

नागरिक हतबल : फुकट्या जाहिरातींनी पेठांसह उपनगरांचेही विद्रूपीकरण


जाहिरातदारांची माहिती असतानाही कारवाईस टाळाटाळ

-Ads-

पुणे – शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पण, शहरातील सर्वच सार्वजनिक ठिकाणे आणि जागा जाहिरातींनी अक्षरश: विद्रूप करण्यात आलेल्या आहेत. रस्त्यावरून जातानाही हे बकालीकरण पुणेकरांना असह्य करते. मात्र, या “चमकू’ व्यावासायिकांवर महापालिका प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याने सर्वसामान्य पुणेकर हतबल आहेत.

शहरात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांमध्ये अशा विद्रूपीकरणाने कहर केला आहे. नारायण पेठ, नवी पेठ, सदाशिव पेठ तसेच शुक्रवार पेठेसह, शिवाजीनगरच्या परिसरात स्पर्धा परीक्षा केंद्राची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्‍लास, मेस, हॉस्टेल चालकांकडून जागा मिळेल तिथे जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यात पीएमपी बसथांबे, स्वच्छतागृहे आणि शाळांच्या भिंती, पथदिवे, रस्ता दुभाजक, झाडे, महावितरणचे फिडर पिलर यावर या जाहिराती चिकटविण्यात आल्या आहेत. एवढेच काय, तर दुभाजकाला रिफ्लेक्‍टर लावलेले असून त्यावरही जाहिराती चिटकविण्यात आल्या आहेत. तर अनेक बस थांब्यावर वेळापत्रक आणि थांब्याच्या नावाची पाटी असते तिथेही जाहिराती चिटकविण्यात आलेल्या आहेत.

या फुकट्या जाहिरातबाजांना मोकाट सोडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी लावलेल्या जाहिराती काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्यांनी काही लाखांच्या निविदा काढल्या जात आहे. त्यानंतरही हे काम अशा प्रकारे केले जाते, की जाहिरातीच बऱ्या दिसत होत्या असे म्हणण्याची वेळ येते. या कामासाठी काही विशेष करावे लागत नसल्याने या निविदा म्हणजे लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचे साधन झाल्या आहेत.

महापालिकेची हाताची घडी
शहर विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत अशा फुकट्या जाहिरातदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे तसेच दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. पण, अधिकारी आणि संबंधित विभागांकडून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. संबंधित जाहिरातदारांना फोन करून त्यांना “मॅनेज’ करून राजरोसपणे जाहिराती लावण्याची मुभा महापालिकाच देते की काय, अशी शंका निर्माण होत आहे.

महापौरांचा प्रभाग अव्वल
दिवसाढवळ्या लावल्या जाणाऱ्या या जाहिरातींवर संबंधित व्यावसायिकांची माहिती उपलब्ध असते. पण, कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक विद्रूपीकरण हे महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रभागतच आहे. तर, उपनगरांमध्येही मोठया प्रमाणात अशा जाहिरातींचा सुळसुळाट आहे.

देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून पुण्याला ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत शहराचे हे विद्रूपीकरण योग्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने अशा जाहिरातदारांवर कारवाई करावी, यासाठी सूचना देण्यात येतील. या कारवाईस टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)