पुण्याचे अधिकारी फैलावर

प्रलंबित जलवाहिनीचे काम : पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्याची तंबी

पिंपरी – भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी नेल्या जाणाऱ्या पाण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पाईपलाईन टाकण्याचे काम संथगतीने सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून चऱ्होली परिसरात हे काम रेंगाळले आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे विनाकारण चऱ्होलीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी तंबी त्यांनी दिली. तसेच आपल्याला काम करणे जमत नसेल तर ते करु नका, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे.

राज्य सरकारने पुणे महापालिकेला भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यास परवानगी दिली आहे. त्याकरिता वाघोली येथे जलशुद्धीकरण बांधण्याचे पुणे महापालिकेचे नियोजन आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम खेड तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायती, आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधून केले जात आहे. यापैकी पुणे-आळंदी रस्त्यावरील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चऱ्होलीगावच्या हद्दीत हे काम सुरु आहे. मात्र, गेली दोन वर्षांपासून हे काम संथगतीने सुरु आहे. रस्ता खोदल्याने अनके अपघात झाले आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी (दि.24) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला नगरसेविका भीमाबाई फुगे, नगरसेवक राहुल जाधव, पिंपरी पालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, पुणे पालिकेचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम, पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, या कामासाठी अनेक ठिकाणच्या जागांचा ताबा पुणे महापालिकेकडे नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कामासाठी जागा उपलब्ध करुन दिली असतानादेखील हे काम गेल्या दोन महिन्यांपासून संथ गतीने सुरु आहे. पुणे महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी या कामाकडे फिरकत देखील नाही. त्यामुळे चऱ्होलीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. हे काम पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)