पुणे: 770 किलो पॉलीप्रोपेलिन बॅग जप्त

साम्याचा घेतला जातोय गैरफायदा
“नॉन ओव्हन पॉली प्रोपिलीन’ पिशवी आणि ज्यूट बॅगच्या दिसण्यात मोठ्या प्रमाणात साम्य आहे. या पिशव्या आकारानुसार, सव्वा रुपयापासून जास्तीत जास्त 4 रुपयांना मिळतात. ज्यूट आणि या पिशव्यांच्या दिसण्यातील साम्याचा गैरफायदा घेऊन विक्रेत्यांकडून या पिशव्या 4 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंत दुकानदारांना विकल्या जात आहेत; तर दुकानदार 5 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत ग्राहकांककडून आकारतात. शासनाच्या आदेशाचा गैरफायदा घेत व्यावसायिकांना फसविण्याचा हा नवीन प्रकार याबंदीनिमित्ताने समोर आला होता. मात्र, प्रशासनाकडून त्याला वेळीच आळा घालण्यात येत आहे.

ज्यूट बॅग म्हणून केली जातेय विक्री : पालिकेची कारवाई

पुणे – राज्यशासनाने नुकत्याच केलेल्या प्लॅस्टिकबंदीत समाविष्ट असलेल्या “नॉन ओव्हन पॉली प्रोपिलीन’ पिशव्यांची ज्यूट बॅग म्हणून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू करण्यात आली होती. या पिशव्यांनाही शासनादेशात बंदी असल्याची बाब दैनिक “प्रभात’ने समोर आल्यानंतर महापालिकेने या बॅग जप्त करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवडाभरात महापालिकेने शहरात तब्बल 770 किलो बॅग जप्त केल्या आहेत.

बंदी आदेशानंतर महापालिकेने शहरातील प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यात गेल्या दोन आठवड्यांत तब्बल 30 टन पिशव्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई वेगाने सुरू असतानाच; घाबरलेल्या विक्रेत्यांच्या भीतीचा गैरफायदा घेत त्यांना या “नॉन ओव्हन पॉली प्रोपेलिन बॅग’ काही व्यावसायिकांनी विकल्या आहेत. मात्र, या पिशव्यांनाही बंदी असल्याने खबरदारीचा उपाय या पिशव्याही जप्त करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून हे जप्तीचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)