पुणे: 11 गावांच्या “डीपी’चा इरादा जाहीर होणार

मुख्यसभेची मान्यता : नियोजनात्मक विकासासाठी तातडीने कारवाई

पुणे – समाविष्ट 11 गावांचा विकास आराखडा अर्थात “डीपी’ तयार करण्यासाठी इरादा जाहीर करण्यास शहर सुधारणा समितीपाठोपाठ महापालिका मुख्यसभेनेही गुरूवारी मान्यता दिली. त्यामुळे हे काम सुरू होण्याचा आणखी एक मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यासाठी नियोजन अधिकारी म्हणून राजेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यासही मुख्यसभेने मान्यता दिली. हा आराखडा वेळेत पूर्ण करून या गावांच्या नियोजनात्मक विकासासाठी त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑक्‍टोबर 2017 मध्ये राज्यशासनाने लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरा नळी), शिवणे (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा महापालिकेत समावेश केला. यानंतर येथील कारभार महापालिकेकडे आल्याने या गावांचे नियोजन प्राधिकरण महापालिका असल्याने तसेच या गावांच्या विकास आराखड्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू करण्याचा ठराव मुख्यसभेने केला. त्यामुळे प्रशासनाने या गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 23 नुसार, इरादा जाहीर करून पुढील प्रक्रिया राबविणे ठरविले आहे. त्यानुसार, महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने खास सभा घेऊन 17 जून रोजी या आराखड्याचा इरादा जाहीर करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यसभेने मान्य केला आहे.

पीएमआरडीएची घेणार मदत
ही गावे पालिकेत येण्यापूर्वी या गावांचे नियोजन “पीएमआरडीए’कडे होते. त्यावेळी “पीएमआरडीए’ने या गावांसाठी 19 जून 2016 मध्ये इरादा जाहीर केला. यासाठी “पीएमआरडीए’ने विद्यमान जमीन वापर (ईएलयू)चे सर्वेक्षण सुरू केले होते. ते पूर्ण झाले असून ते अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे “पीएमआरडीए’कडून हा “ईएलयू’ मिळाल्यास महापालिकेस पुन्हा या गावांचे सर्वेक्षण करावे लागणार नाही. ही माहिती मिळाल्यास पालिकेस केवळ नवीन आरक्षणे टाकणे (पीएलयू) आणि त्यावर हरकती आणि सूचना मागवून त्यावर सुनावणी घेऊन हा आराखडा राज्यशासनास पाठविण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने या पूर्वीच “पीएमआरडीए’कडे पीएलयूची मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)