पुणे: हे भाजपचे शहराध्यक्ष, की एजंट?

कॉंग्रेस गटनेत्यांचा बोचरा प्रश्‍न : पालिकेत लक्ष न देण्याचा सल्ला
महापौरांवर दबावतंत्र चालवल्याचाही आरोप

पुणे – फोर्स कंपनीच्या प्रस्तावाचा विचार करावा, तोपर्यंत पीएमपीएमएलच्या कोणत्याही प्रस्तावावर प्रक्रिया करू नये, अशा आशयाचे पत्र भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी देऊन महापौरांवर दबावतंत्र चालवल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत की एजंट आहेत, असा बोचरा प्रश्‍नही शिंदे यांनी विचारला असून, या पत्रप्रपंचाचा निषेध व्यक्त केला आहे. गोगावले यांनी संघटनात्मक कामात लक्ष घालावे, महापालिका आणि ठेकेदारीत लक्ष घालू नये, असा सल्लाही शिंदे यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी पुणे शहर भाजपने विविध उद्योग समूहांकडून प्रस्ताव आणि सूचना मागविल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत फोर्स कंपनीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे एक महिन्यापूर्वी दिला होता. यावेळी आयुक्तांसमोर झालेल्या बैठकीत पीएमपीएमएलचे आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावाबाबतचा अभिप्राय चार दिवसांत द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या होत्या. परंतु एक महिना झाला, तरी याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार करत गोगावले यांनी महापौरांना पत्र लिहिले आहे.

प्रशासनाच्या अशाप्रकारच्या भूमिकेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एकात्मिक आराखडा तयार करून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासन गंभीर नाही, असा संदेश नागरिकांमध्ये जातो. पीएमपीएमएलच्या विविध उपक्रमांना या पुढील काळात भाजपने कशा प्रकारे पाठिंबा द्यावा, याबाबतचे प्रश्‍न निर्माण होत आहेत, असे गोगावले यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
एवढेच नव्हे तर फोर्स कंपनीच्या प्रस्तावावर तातडीने अभिप्राय द्यावा. तोपर्यंत पीएमपीएमएलच्या कुठलाही प्रस्ताव किंवा त्याबाबतची प्रक्रिया करू नये;तशा सूचनाही प्रशासनाला द्याव्यात, असेही या पत्रात म्हटले आहे. गोगावले यांनी महापौरांना पाठवलेले हे पत्र म्हणजे आदेशच आहे. महापौर हे कोणत्या एका पक्षाचे नसून शहराचे आहेत. गोगावले हे त्यांच्यावर दबावतंत्र टाकत आहेत, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.
जे जास्त उत्पन्न देणारे रस्ते आहेत त्याच रस्त्यावर फोर्स कंपनीच्या मिनीबस धावणार आहेत. याशिवाय ही कंपनीच त्याचे थांबे ठरवणार. या रस्त्यातून मिळणारे उत्पन्न तीन वर्षे ही कंपनी घेणार असे फोर्सच्या प्रस्तावात म्हटले आहे. वास्तविक फोर्स कंपनीने नमूद केलेले तीन रस्ते हे जास्त उत्पन्न देणारे आहेत. महापालिकेची स्वत:ची कंपनी असताना दुसऱ्या कंपनीला काम देण्याचा प्रश्‍न येत नाही. आणि त्यातून या विषयासाठी अशाप्रकारचे पत्र देऊन महापौरांवर दबाव टाकणे चुकीचे असल्याची टीकाही शिंदे यांनी केली आहे.

वास्तविक असे कोणतेही काम देताना जाहिरात द्यावी लागते, कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण करावी लागते, एक्‍प्रेशन ऑफ इंटरेस्ट द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी राज्यसरकारची परवानगी लागते, असे शिंदे म्हणाले.

अध्यक्ष, तुम्ही सुद्धा? – विरोधी पक्षनेते चेतन तुपे
भाजप शहराध्यक्षांनी असे पत्र देऊन एकप्रकारे दमबाजीच केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचारामध्ये बरबटली असताना आता भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी खासगी कंपनीसाठी दलाली सुरू केली आहे, अशी खरमरीत टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. शहराध्यक्षांनी पक्ष संघटनेचे काम करणे अपेक्षित असताना ते दलालीच्या रेसमध्ये उतरले आहेत. त्यामुळे कोणत्या नाकाने ते हातात छडी घेऊन त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांवर ते अंकुश ठेवणार हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, अशीही टीका तुपे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)