पुणे: हॅकिंगप्रकरणातील 3 कोटी रु. परत मिळविले

मॅन इन मिडल ऍटॅक म्हणजे काय?
या सायबर क्राईम प्रकारामध्ये दोन वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांतील खरेदी-विक्री, आयात-निर्यात व्यवहारांचे ई-मेल हॅक केले जातात. यानंतर रक्कम देणाऱ्या कंपनीस बनावट ई-मेल आयडी पाठवून जणू मूळ कंपनीच ई-मेल करते आहे, असे भासवले जाते. त्यामुळे खरेदीदार कंपनी बॅंक खात्यात रक्कम वर्ग करताना कोणतीही खातरजमा करत नाही. फसवणूक झालेले रक्कम गुन्हेगार तत्काळ काढून घेतात. फसवणूक झालेली लक्षात येण्यास उशीर झाल्याने रक्कम परत मिळविणे अशक्‍य होते.

सायबर क्राईम सेलचे यश : बनावट मेल आयडीतून घातला होता गंडा
चिनी बॅंकेतून रक्‍कम मिळविल्याने कंपनीला दिलासा

पुणे – ऑनलाइन फसवणुकीद्वारे परदेशी बॅंकेत गेलेली तब्बल 3 कोटींची रक्‍कम परत मिळवण्यात पुणे सायबर क्राईम सेलला यश मिळाले आहे. हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीच्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून “मॅन इन मिडल ऍटॅक’ या हॅकिंगच्या प्रकारानुसार ही फसवणूक झाली होती. ही कंपनी जगभरात दुचाकी व चारचाकी वाहनांचे हेडलाइट बनविण्याचे काम करते. त्यासाठी लागणारा कच्चा माल ते इतर देशांतील सप्लायर्सकडून मागवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कंपनीने मशीन खरेदीसाठीची ऑर्डर चीनमधील मशिनरी बनविणाऱ्या कंपनीस ई-मेल आयडीद्वारे पाठवली होती. त्यानुसार ऍडव्हान्स रक्कम देण्याचे ठरले होते. दरम्यान, अज्ञाताने चीनमधील कंपनीच्या ई-मेल आयडीसारखा दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार करुन तक्रारदारास संपर्क केला. तसेच पर्चेस इनव्हाईस बॅंक खात्यात बदल झाल्याचे सांगून खरेदीची ऍडव्हान्स रक्कम चीनमधील अन्य बॅंक खात्यावर भरण्याची सूचना दिली होती.

तक्रारदाराने कंपनीच्या बॅंक खात्यातील बदलाबाबत कोणतीही खातरजमा न करता रक्कम वर्ग केली होती. यानंतर पाठवलेल्या पैशांची खातरजमा करण्यासाठी चीनमधील कंपनीस ई-मेल करण्यात आला होता. तेव्हा चीनमधून बॅंक खात्यात रक्कम जमा न झाल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने तत्काळ सायबर क्राईम सेलशी संपर्क साधला. तक्रार प्राप्त झाल्यावर सायबर क्राईम सेलने चीनमधील बनावट ई-मेल धारकाच्या बॅंक खात्याची माहिती मिळवली. चीनमधील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने बॅंकेस पत्रव्यवहार केला. याप्रकारे फसवणूक झालेली रक्कम मूळ खात्यात तत्काळ परत मिळविण्यात सायबर क्राईम सेलला यश आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, मनीषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, महिला पोलीस शिपाई शितल वानखेडे यांच्या पथकाने केली.

फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
-आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना प्रत्यक्ष किंवा खात्री करुन व्यवहार करावेत.
-परदेशी कंपनीचे ई-मेलबाबत खात्री करावी.
-ई-मेल सर्व्हिस देणाऱ्या कंपनीकडून संगणक यंत्रणेचे ऑडिट करुन घ्यावे.
– ई-मेलची हाताळणी शक्‍यतो एकाच व्यक्तीकडून केली जावी.
– वेळोवेळी पासवर्ड बदलत जावा.
– इंटरनेट सिक्‍युरिटी पुरवणाऱ्या ऍन्टी व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करावा.
– फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)