पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इंदापूर नगरपरिषदेचे कौतुक

रेडा – इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत देशात 68वा क्रमांक संपादन करून पहिल्या 100 मध्ये येण्याचा बहुमान मिळविल्याबद्‌ल शहा सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या विशेष समारंभामध्ये नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम आणि नगरसेवकांचा सत्कार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पाटील यांनी नगरपरिषदेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या कामगिरीमुळे राज्याच्या नगरविकास विभागाकडून इंदापूर नगरपरिषदेस पाच कोटी रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षीस शहराच्या विकासाला मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशातील 4200 नगरपरिषदेमधून इंदापूर नगरपरिषदेचा क्रमांक 68वा आला तसेच देशातील सर्व राज्यांचे पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर असे चार विभाग करण्यात आले होते. पश्‍चिम विभागात महाराष्ट्र राज्यासह एकूण सहा राज्यांचा समावेश होता. या विभागात इंदापूर नगरपरिषदेचा 45वा क्रमांक आला तर राज्यात 42वा क्रमांकावरचे यश संपादन केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता अभियान सर्वेक्षणामध्ये इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेसंबंधी देशपातळीवर केलेली कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. शहरातील नागरिकांचे जाहीर आभार. नगरपरिषदेने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जे प्रबोधन व जागृती केली तसेच नगराध्यक्षा, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनी नियोजन करून प्रत्यक्षात कार्य हाती घेवून कर्मचारी वर्गाचे कष्ट व नागरिकांचा सहभाग यामुळे देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी करता आली.

अंकिता शहा म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू होती. यामध्ये शहरे हागणदारीमुक्त करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, या दोन प्रमुख बाबीं बरोबरच अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे, जनजागृती करणे तसेच शहरांची या कार्यासाठी क्षमता वाढविणे याला शासनस्तरावर महत्त्व देण्यात आले होते. यामध्ये इंदापूर नगरपरिषदेने राज्यात पहिल्या 50 मध्ये येण्याचा बहुमान मिळविला असून इंदापूर नगरपरिषदेचा क्रमांक 42 वा आहे. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समीतीचे सभापती करणसिंह घोलप, नगरसेवक भरत शहा, जगदीश मोहिते, मनिषा शिंदे, मीना मोमीन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)