पुणे : हक्काच्या वसुलीकडे पालिकेचा कानाडोळा

लेखापरीक्षण अहवाल


आर्थिक घडी विस्कटलेलीच


मागील वर्षात फक्‍त 10 कोटी रुपयांची वसुली

पुणे- महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या विविध विभागांच्या ऑडिटमध्ये 40 प्रकरणांमध्ये तब्बल 84 कोटी रुपयांची वसूलपात्र रक्कम निदर्शनास आणून दिल्यानंतरही या विभागांनी जेमतेम 10 कोटी 47 लाख रुपयेच वसूल केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एका बाजूल घटलेल्या उत्पन्नामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच, प्रशासनाकडून वसूलपात्र रकमेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे महापालिकेमध्ये जवळपास प्रत्येक विभागाच्या आर्थिक प्रस्तावांचे ऑडिट केले जाते. ज्या प्रस्तावांमध्ये चुकीच्या नोंदीमुळे बिलांच्या रकमेत फरक असल्यास प्रामुख्याने वस्तुस्थितीपेक्षा कमी आकारणी झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यास असे प्रस्ताव लेखा परीक्षण विभाग ऑडिट उपसमितीच्या माध्यमातून स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देते. ऑडिट उपसमितीने अशा प्रस्तावांबाबत संबधित विभागाला कळवून वसुलीचे निर्देश द्यायचे, अशी साधारण कार्यपद्धती आहे.

मागील तीन ते चार वर्षांमध्ये लेखा परीक्षण विभाग दरवर्षी सरासरी 40 ते 50 प्रस्तावांमध्ये 90 कोटी रुपयांची वसूलपात्र रक्कम निदर्शनास आणून देत असतो. मागील आर्थिक वर्षात अर्थात 2017-18 मध्ये लेखा परीण विभागाने भूमीजिंदगी, बांधकाम, आरोग्य, करसंकलन, चाळ विभाग आणि जकात विभागाचे मिळून प्रस्तावांवर आक्षेप नोंदवत 83 कोटी 91 लाख रुपये वसुलपात्र रक्कम निदर्शनास आणून दिली होती.

विशेष असे, की यामध्ये सर्वाधिक वसूलपात्र रक्कम सुमारे 34 कोटी 6 लाख रुपये ही आरोग्य विभागाची होती. परंतू लेखा परीक्षण विभागाने हे वर्षभर वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्यानंतरही सर्व विभागांकडून जेमतेम 10 कोटी 47 लाख रुपये इतकीच रक्कम वसुल करण्यात आली. दरवर्षी साधारण वसुलीचे प्रमाण एवढेच असते. एकीकडे महापालिकेला दरवर्षी अंदाजपत्रकापेक्षा 18ते 20 टक्के कमी उत्पन्न मिळते.

प्रत्येक वर्षी अंदाजपत्रक सादर करताना महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीकडून उत्पन्न वाढीसाठी थकबाकी वसुली, विविध ऍमनिस्टी स्कीम राबविण्याचे आश्‍वासन दिले जाते. महापालिकेने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी कर्जरोखेही काढले आहेत. अशा परिस्थितीत दरवर्षी हक्काच्या सुमारे 70 कोटी रुपयांच्या वसुलीकडे पालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)