पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने नीती आयोगाच्या सहकार्याने पहिल्या स्मार्ट सिटी हॅकॅथॉनचे पुण्यात आयोजन

पुणे : शहरातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशन (पिफ) या स्वयंसेवी (नॉन-प्रॉफिट) उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. विविध नाविन्यूपर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी पिफच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगाच्या सहकार्याने पहिली स्मार्ट सिटी हॅकॅथॉन पुण्यात आयोजित करून ‘पिफ’च्या उपक्रमांची सुरवात करण्यात येत आहे.
पुणे शहरासह देशभरातील विविध शहरांतील व्यक्ती व संस्थाही यामध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी स्पर्धकांच्या वतीने पुणे शहरातील नागरी शासनापुढील समस्यांची उकल आणि त्यावरील शाश्वत उपाययोजना कशी करावी याबाबतच्या कल्पना आणि उदाहरणादाखल नमुने सादर करण्यात येतील, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

ऑनलाईन हॅकॅथॉनची सुरवात शुक्रवारपासून करण्यात आली असून, ऑफलाईन हॅकॅथॉन २९ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात होणार आहे. https://www.hackerearth.com/sprints/niti-aayog-pune-smart-city-hackathon/ या संकेतस्थळावर स्पर्धकांना अधिक माहिती मिळेल. अमेरिकेतील रॉकी माऊंटन इंस्टिट्यूट ही या ऑफलाईन हॅकॅथॉनची ज्ञान भागीदार (नॉलेज पार्टनर) संस्था असून, याचे संयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात येणार आहे. टेक महिंद्रा, तसेच डेल ईएमसी या जागतिक तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आरबीएल यांचे सहकार्य या हॅकॅथॉनला लाभले आहे. या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस आणि इतर मान्यवर व उद्योजक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सह-अविष्कार आणि समूह स्त्रोत तथा क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून नागरी शासनासमोरील आव्हानांची उकल करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने यात पुढाकार घेतला आहे. पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि डिजिटल कनेक्टिविटी हे या स्पर्धेतील विषय असतील. सहभागी स्पर्धकांनी तंत्रज्ञानाचा उत्कृष्टरीत्या वापर करून शहरासाठी शाश्वत उपाययोजना सुचवणे अपेक्षित आहे. ही उपाययोजना एका उत्पादनाच्या स्वरुपात असेल किंवा अंमलबजावणीच्या उदाहरणासह एखादी नाविन्यपूर्ण कल्पना असेल. सहभागी सर्व स्पर्धक संघांना समान संधी देण्यासाठी सोल्यूशनथॉन आणि आयडियाथॉन असे दोन स्वतंत्र प्रकारांमध्ये त्यांचे मूल्यांकन करण्यात येईल. यामध्ये प्रस्तावित उपाययोजनेची पातळी आणि त्यांची शहरात अंमलबजावणी करण्याची शक्यता लक्षात घेण्यात येईल.

यावेळी हॅकॅथॉनबद्दल बोलताना सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “नीती आयोगाच्या सहयोगाने हा कार्यक्रम राबवणे पुणे स्मार्ट सिटीसाठी अभिमानास्पद बाब आहे. आपण डेटा संचलित युगात राहतो आहोत आणि यामुळे संशोधन आणि नाविन्यपूर्ण अविष्कारांसाठी मोठ्या संधी आपल्याला आहेत. समाजाच्या सर्व स्तरांतील बौद्धिक ताकदीचा वापर करून नव्या उपाययोजना आणि सुसह्य जीवन, सुरक्षित आणि परिवर्तनशील अवकाशाची सहनिर्मिती करता येईल. आपल्या शहराला आणि पर्यायाने देशाला बाधक ठरणाऱ्या बाबींवर मात करण्यासाठी स्टार्ट अप्स, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी हॅकॅथॉनमध्ये एकत्र येण्याचे आवाहन मी करतो.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)