पुणे – स्फूर्तीदायक 75 स्वराज्यरथांची मिरवणूक

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजन : मर्दानी चित्तथरारक खेळांची मानवंदना

पुणे – सनई, चौघड्यांसह 51 रणशिंगांचे वादन.. आकर्षक फुलांची सजावट.. चित्तथरारक मर्दानी खेळांचे सादरीकरण.. धनगरी नृत्याचे सादरीकरण.. ढोल पथकाचे जल्लोषपूर्ण वातावरण.. आकर्षक प्रवेशद्वार.. आबालवृद्धांचा उत्साह.. ऐतिहासिक वेशभूषेतील नागरिकांचा सहभाग.. हजारोंच्या संख्येत पारंपरिक पोशाखात उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांच्या आवाजातील “जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष..आणि स्फूर्तीदायक 75 स्वराज्यरथ.. असे भव्य वातावरण मंगळवारी पुणेकरांना अनुभवता आले.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथे आयोजित भव्य मिरवणुकीचे. यामध्ये विविध स्वराज्यरथ पुणेकरांना पाहाता आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, हणमंत गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, उद्योजक युवराज ढमाले, रोहित पवार, अभिनेते प्रवीण तरडे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे आदी उपस्थित होते.

लालमहाल चौकात अमर जवान स्तंभ उभा करून पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोल्हापूरच्या लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेल्या जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योतीचे प्रज्वलन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

यावेळी महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींनी मर्दानी चित्तथरारक खेळांची मानवंदना दिली. तर शिवगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादनाने वातावरण जल्लोषमय झाले होते. सोहळ्यामध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर, हैबतराव शिळीमकर, रणमर्द संभाजी कोंढाळकर, सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या पुतळ्याचे व बडोद्याचे दमाजीराव गायकवाड सरकार यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

मिरवणुकीतील सहभागी स्वराज्यरथ
सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, हैबतराव शिळीमकर, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहीते, संताजी घोरपडे, सरनोबत सिधोजी थोपटे, वीरमाता धाराऊ गाडे, सरनोबत नागोजीराव कोकाटे, सरखेल कान्हाजी आंग्रे, सरदार लखुजीराजे जाधवराव, सरदार लुखजीराव घारे, शुरवीर शेलार मामा, खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार शिवाजी इंगळे, वीर बाजीप्रभू देशपांडे आदी 75 स्वराज्यरथ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)