पुणे – स्टार कासवाची तस्करी करणाऱ्या युवकास कोठडी

पुणे – स्टार कासवाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट-3 च्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून दोन कासव जप्त करण्यात आले आहे. प्रशांत सुदाम सातपुते (वय 29, रा. खिलारेवाडी, कर्वे रस्ता, एरंडवणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुरूवारी (दि. 23) रोजी नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी नितीन रावळ यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, खिलारेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कासव विक्रीसाठी आणले आहेत. ते त्याने घरात लपवून ठेवले आहेत. पोलिसांनी लगेच याबाबत वनक्षेत्र अधिकारी दीपक पवार आणि वनपरिमंडळ अधिकारी गणेश सरोदे यांना माहिती दिली. संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कासव शेड्युल “ए’ मधील प्रतिबंधित प्राणी आहे. तो नामशेष होत असल्याने त्याचे जतन करण्याची तरतूद आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. ताब्यात घेतलेले कासव कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात देण्यात आले. “कासव, मांडूळ बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो,’ अशी अंधश्रद्धा आहे. त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये. कासव, घुबड, मोर, देशी आणि गावठी पोपट, हरीण, मांडूळ हे प्राणी जवळ बाळगू नयेत. हे प्राणी आढळल्यास प्राणी वनविभाग अथवा जवळील पोलीस कारवाई करू शकतात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कायद्यानुसार तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सातपुते याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी “कासव कोठून आणले, कोठे विकणार होता, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का,’ याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-3 चे पोलीस निरीक्षक दीपक कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे, मच्छिंद्र वाळके, नितीन रावळ, कैलास साळुंके, रोहिदास लवांडे, गजानन गानबोटे आणि विल्सन डिसोझा यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)