पुणे-सोलापूर महामार्गावर वाळू ट्रकवर कारवाई

ट्रकमालकांकडून लिहून घेले हमीपत्र
या ट्रकमालकांकडून पुन्हा चोरून आणि नियमबाह्य वाळू वाहतूक करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाणार असून, त्यामुळे भविष्यात पुन्हा ही वाहने वाळू वहातूक करताना सापडली, तर ते जप्त करण्यात येणार आहेत. हमीपत्र लिहून दिल्यानंतर प्रतिब्रास 37 हजार 900 रुपये दंडाची रक्कम जमा केल्यानंतर हे वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

18 ब्रास वाळू जप्त: 6 लाख 82 हजारांचा दंड होणार वसूल

थेऊर, दि. 22 (वार्ताहर) – पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-सासवड राज्यमार्गावर थांबलेल्या अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या सहा ट्रकवर महसूल विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, या सहा ट्रकमध्य एकूण सुमारे 18 ब्रास वाळू असल्याने प्रतीब्रास 37 हजार 900 रुपयांप्रमाणे एकूण 6 लाख 82 हजार रुपये महसूली दंड वसूल होण्याची शक्‍यता तहसील कार्यालयाकडून व्यक्त केली आहे.

अवैधरित्या गौणखनिजाची चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल पथकाला दिले आहेत. त्यासोबत गौणखनिजाची चोरी आणि पर्यावरणाची होत असलेली हानी या दृष्टीने गुन्हे दाखल करणे शासनाच्या विचाराधीन आहे.- प्रशांत पिसाळ, तहसीलदार, हवेली

महसूल पथकाने शेवाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत 6 मार्च रोजी केलेल्या कारवाईत एका ट्रकसह जेसीबी जप्त करण्यात आला होता. मात्र, ही दोन्ही वाहने वाळू माफियांनी कोतवालांना धमकी देऊन पळवून नेली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण पसरले होते. याची दखल घेऊन हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांनी हडपसरच्या मंडल अधिकारी तेजस्विन साळवेकर, उरुळी कांचन आणि वाघोलीचे मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांच्यासमवेत तलाठी संतोष चोपदार (थेऊर), अशोक शिंदे (वाघोली), प्रदीप जवळकर (उरुळी कांचन), रतन कांबळे (फुरसुंगी), दिलीप पलांडे (महम्मद वाडी), श्रीकृष्ण शिरसाट (हडपसर), तसेच कोतवाल रामलिंग भोसले, गोविंद महाडिक, योगेश पवार, रतन हिंगणे, नामदेव शिंदे, रवी घुले यांच्यासमवेत ही कारवाई केली.
महसूलच्या कारवाईत अवैध वाहतूक करणारा वाळू ट्रक पकडला गेला की वाहतूकदार आपली वाहने रस्त्यांच्या कडेला सोडून चावी घेऊन निघून जातात. महसूल पथक निघून गेल्यानंतर आपली वाहने घेऊन जातात. यांमुळे महसूलचे अधिकारी हतबल होत होते. कारवाई सुरू असताना वाहनधारकांचे वाहने सोडून पोबारा करण्याचा प्रयत्न आज (दि. 22) फसले. महसूल पथकाने तत्परता दाखवून या वाहनांच्या चाव्या अगोदरच ताब्यात घेतल्या होत्या आणि वाहन चालकांकडे कोणतेही शासकीय चलन नसल्याने वाहन चालकासमोर कारवाईस सामोरे जाणे, हा एकच पर्याय शिल्लक होता. यापूर्वी कारवाईमध्ये पकडले गेलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेले होते. त्याची पुनरावृत्ती येथे होऊ नये म्हणून हे ट्रक योग्य बंदोबस्तात हवेली प्रांत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत लावण्यात आले आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)