पुणे: सुरू होण्यापूर्वीच ई-लर्निंग “शट डाऊन’

प्रशासनही हतबल..
ई-लर्निंग प्रकल्प अंमलबजावणीबाबत बोलण्यास महापालिकेचा एकही अधिकारी तयार नाही. मोठा गवगवा करत, प्रशासनाने आधी 100 आणि नंतर 50 शाळा, तर 21 जून रोजी उपराष्ट्रपती येत असल्याने त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी 5 शाळांची निवड केली. मात्र, त्या शाळांमध्येही यंत्रणा कार्यरत करता न आल्याने हे उद्‌घाटन पुढे ढकलण्याची वेळ महापालिकेवर आली. तर आता फक्‍त 18 शाळांमध्ये ही यंत्रणा असली, तरी ती अर्धवट असल्याने तसेच स्टूडिओच तयार नसल्याने हा प्रकल्प सुरू करणे शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले.

अवघ्या 18 शाळांमध्ये यंत्रणा : स्टूडिओ नसल्याने तीसुद्धा बंदच

पुणे – महापालिका शिक्षण विभाग शाळांमध्ये तब्बल 21 कोटी रुपये खर्च करून ई-लर्निंग प्रकल्प यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला जाणार होता. मात्र, शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले, तरी फक्‍त 18 शाळांमध्ये याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुलांना थेट संवाद साधता यावा, यासाठी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अत्याधुनिक स्टूडिओ उभारला जाणार होता. याचे काम 20 जूनपर्यंत पूर्ण होऊन या 18 शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प सुरू होणे अपेक्षीत होते. मात्र, ही दोन्ही कामे अर्धवट असल्याने हा प्रकल्प अजून सुरूच झालेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2017-18 च्या अंदाजपत्रकात पालिकेच्या सर्व शाळांसाठी ई-लर्निंग योजना प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी 24 कोटींचे काम बीएसएनएल संस्थेला देण्याचा प्रस्ताव तत्कालिन स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला. नंतर खर्च तसेच या प्रकल्पाच्या अभ्यासक्रमावरून मोठा वाद झाला. त्यानंतर प्रशासनाने प्रकल्पाच्या खर्चात काही बाबी कमी करत ही योजना 21 कोटींवर आणून ठेवली. त्यानंतरही हे काम बीएसएनएलला देण्यात आले. मार्च 2018 मध्ये याचे कार्यादेश देण्यात आले. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या 100 शाळांमध्ये 21 जून 2018 पूर्वी ही यंत्रणा उभारण्याचे आदेश होते. त्यानंतर हे शक्‍य होत नसल्याचे दिसताच, 50 शाळांमध्ये यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, ही मुदत उलटून आठवडा लोटला तरी अवघ्या 18 शाळांमध्येच ही यंत्रणा उभारण्यात आली असून तीदेखील अर्धवटच आहे. त्यामुळे ही योजना यंदा नेमकी किती शाळांमध्ये सुरू होणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

कारवाई का नाही ?
महापालिकेने या वर्षीपासून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यासाठी काम देण्यात आलेल्या बीएसएनएलला हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 20 जूनची मुदत असल्याचे शिक्षण विभाग प्रभारी प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सांगितले. मात्र, काही अडचणींमुळे हा प्रकल्प अजून सुरू झालेला नसला, तरी पुढील काही दिवसांत तो सुरू केला जाणार असल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले. मात्र, मुदत संपल्यानंतरही वेळेत काम न झाल्याने संबधित कंपनीवर प्रशासन काय कारवाई करणार का, असा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)