पुणे: हिरो इंडियन सुपर लीगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने मंगळवारी एफसी पुणे सिटीवर 2-0 असा सफाईदार विजय मिळविताना गुणतक्त्यात दुसरे स्थान गाठले आहे. नायजेरियाचा हुकमी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने पूर्वार्धात गोल केला, तर अखेरच्या मिनिटाला जुआन मॅस्कीया याने पेनल्टी सत्कारणी लावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
ओगबेचेने 23व्या मिनिटाला लक्ष्य साधले. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने अप्रतिम चेंडू मारला. ओगबेचने छातीवर चेंडू नियंत्रित केला आणि सफाईने नेटमध्ये घालविला. त्याचा हा मोसमातील आठवा गोल आहे. अखेरच्या मिनिटाला साहील पन्वरने मॅस्कीया याला पाडले. त्यामुळे पंचांनी नॉर्थइस्टला पेनल्टी बहाल केली. मॅस्कीयाने नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारत ही संधी सत्कारणी लावली.
नॉर्थइस्टने अपेक्षेप्रमाणे सकारात्मक सुरवात केली. नवव्या मिनिटाला त्यांनी पहिला प्रयत्न केला. ओगबेचेने डावीकडून चेंडूवर ताबा मिळविला. स्वतःला संधी असूनही त्याने जुआन मॅस्कीया याला पास दिला. मॅस्कीयाने मारलेला फटका मात्र ब्लॉक झाला. तर, पुणे सिटीने 12व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला. मार्सिलिनियो याने कॉर्नरवर बॉक्समध्ये चेंडू मारला. हा चेंडू रॉलीन बोर्जेसने हेडिंगने बाजूला घालविला, पण तो आशिक कुरूनीयन याच्यापाशी गेला. कुरूनीयनने जाव्या पायाने फटका मारला, पण नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने उजवीकडे जात चेंडू अडविला. तेव्हा बचाव फळीतील सहकारी योग्य ठिकाणी नसल्यामुळे त्याने उघड नाराजी व्यक्त केली.
तर, 28व्या मिनिटाला ओगबेचेने थेट पास देताच फेडेरिको गॅलेगोने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला. पुढच्याच मिनिटाला कुरुनियन याने डावीकडून मुसंडी मारली. त्याने ह्युमला पास दिला, पण उंचपुरा सेंटरबॅक मॅटो ग्रजिच याने ही चाल हाणून पाडली. ह्यूम 34व्या मिनिटाला पुन्हा अचूकता साधू शकला नाही. त्यामुळे डावीकडून साहील पन्वर याने दिलेला पास वाया गेला. ह्युमने जास्त ताकद लावलेला फटका पवनने रोखला. 41व्या मिनिटाला पुण्याला फ्री किक मिळाली. त्यावर मार्सेलिनियो याने बॉक्समध्ये मारलेला चेंडू मॅट मिल्सने हेडिंग केला, पण पवनने नॉर्थइस्टचे नेट सुरक्षित राखताना अफलातून बचाव केला. दुसऱ्या सत्रात गॅलेगोने 47व्या मिनिटाला प्रयत्न केला होता.
नॉर्थइस्टने आठ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व एका पराभवास त्यांचे 17 गुण झाले आहेत. नॉर्थइस्टने दुसरे स्थान गाठले. त्यांनी एफसी गोवा (8 सामन्यांतून16) व जमशेदपूर एफसी (9 सामन्यांतून 14) यांना मागे टाकले. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 19 गुणांसह आघाडीवर आहे. पुण्याला नऊ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण असून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा