पुणे: साहित्य वाटपाची यंदाही “शाळा’!

30 जूनपर्यंत खाती उघडणार?
उर्वरित मुलांची बॅंक खाती 30 जूनपर्यंत उघडून त्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केल्याचे योगेश मुळीक यांनी सांगितले. मात्र, एवढी खाती उघडण्यास ही मुदत अतिशय कमी असून प्रशासनाच्या दाव्याबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे. खाते उघडण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे, बॅंका, तसेच त्यांच्या पडताळणीसाठी मोठा कालावधी लागतो. महापालिकेने मागील वर्षी “डीबीटी’ योजना राबविली. त्यावेळी खाती आधारशी जोडण्यास प्रशासनास तब्बल 6 महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे नवीन खाती उघडण्यास वेळ गेल्यास मुलांना साहित्य खरेदीस उशीरच होणार आहे.

50 हजार मुलांचीच बॅंक खाती : इतरांना करावी लागणार प्रतीक्षा

पुणे – महापालिका शाळांमधील मुलांना या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशासाठीचे अनुदान थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. मात्र, 15 जून रोजी शाळा सुरू होताना प्राथमिकच्या 41 हजार 977 आणि माध्यमिक विभागाच्या 8 हजार मुलांचीच बॅंक खाती असल्याने त्यांना ही अनुदानाची रक्कम मिळणार आहे. तर उर्वरीत मुलांची बॅंक खाती उघडल्यानंतरच त्यांना ही रक्कम मिळणार आहे. त्यामुळे यंदाही 50 टक्के मुलांना गणवेश आणि शालेय साहित्यासाठी उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटपाचे अनुदान बॅंकेत जमा करण्याचा निर्णय स्थायी समितीने दोन आठवड्यांपूर्वी घेतल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागास दिले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 84 हजार 433 मुले आहेत. त्यातील 41 हजार 977 मुलांची बॅंक खाती असून उर्वरीत मुलांची अद्याप बॅंकेत खाती नाहीत. तर ज्या मुलांची खाती आहेत, त्यातील 15 हजार 716 मुलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. माध्यमिक विभागाकडे 12 हजार मुलांची नोंद असून त्यातील 8 हजार मुलांची बॅंक खाती आहेत. त्यावर पुढील दोन दिवसांत अनुदान जमा केले जाणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यामुळे अद्यापही 50 टक्के मुलांची बॅंक खातीच नसल्याने ती खाती उघडणे अथवा पालकांची खाती संलग्न करून त्यावर रक्कम जमा करणे यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)