पुणे-सातारा महामार्ग रोखला

कापूरहोळ-मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी चेलाडी नसरापूर (ता. भोर) येथे भोर-वेल्हे शिवगंगा खोऱ्यातील हजारो मराठा समाजाच्या युवकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज (रविवारी) रास्तारोको करून शासनाचा निषेध नोंदविला. तर यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणांबाजी परिसर दुमदुमून गेला होता.
मराठा आरक्षासाठी ज्या आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पणकरून या रस्तारोकोला सुरुवात केली. तर या आंदोलनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपली दैनंदीन कामे बाजूला ठेवून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. महामार्गावर हजारो युवकांनी ठिय्या दिल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होता. मोर्चेकऱ्यांच्या “एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, जय जिजाऊ जय शिवराय’ आदी घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला होता. या ठिय्या आंदोलनात सर्व पक्षांनी आपल्या पक्षांचे जोडे बाहेर ठेऊन सहभाग घेतला होता. यात संग्राम थोपटेंसह राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, कृषी क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाद्वारे आज महामार्ग रोखला जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आणि खबरादारीचे उपाय म्हणून रास्तारोकोच्या आधी पोलिसांनी आंदोलनच्या ठिकाणापासून सुमारे दहा किमी आधीच वाहने रोखून धरली होती. तर महामार्ग पोलिसांनी आंदोलनाच्या तासभर अगोदरच साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना कापूरहोळ-सासवड मार्गे हाडपसर पुणे असा रस्ता सुचविला तर पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना खेडशिवापूर मार्गे सासवड-सातारा असा मार्ग सूचविला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली होती.

  • पोलिसांचा फौजफाटा
    पुणे ग्रामीण पोलीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोनशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. यात एसआरपीचा फौज फाटा तसेच ऐनवेळी अश्रूधूर सोडणारे पथक, लाठीचार्ज पथक, पाच पिंजरे, क्रेन, रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. तर पुणे ग्रामीणचे अतिरीक्‍त पोलीस उपाधीक्षक संदीप पखाले, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल गोडसे व पोलीस ठाण्यांतर्गतचे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी व महामार्ग वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
  • जिल्ह्यातील दुसरा बळी
    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंगोरी गावच्या दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय 40) यांनी शुक्रवारी (दि. 3) आत्महत्य केल्याची घटना ताजी असता भोर तालुक्‍यातील आंबावडे गावातील अरूण जगनाथ भडाळे (वय 25, रा. आंबावडे, ता. भोर) या तरुणाने शनिवारी (दि. 3) तुर्भे (नवी मुंबई) येथे आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून यात मराठा आरक्षण व कर्ज मिळत नसल्याच्या कारणाने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आरक्षणासाठी जिल्ह्यातील हा दुसरा बळी ठरला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)