पुणे-सातारा महामार्ग पावसाळ्यापूर्वी व्हावा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


नितीन गडकरींनी दिली होती 6 महिन्यांची ‘डेडलाइन’

पुणे- मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या पुणे -सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी करा, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबधित ठेकेदार कंपनीला दिले आहेत.

पुणे- सातारा महामार्गाचे काम दिलेली कंपनी ही अत्यंत अव्यावसायिकपणे काम करीत आहे. त्यामुळेच हे काम रेंगाळले आहे; परंतु आता अशी परिस्थिती आहे की, या दिरंगाईमुळे त्यांचे कंत्राट रद्द करणे देखील शक्‍य नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनच काम पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. उर्वरित कामांमध्ये निर्माण होणारे प्रश्‍न आम्ही मार्गी लावले आहेत. खेडशिवापूर, नसरापूर आणि वेळू येथील महत्त्वाची कामे करावयाची आहेत. आवश्‍यक त्या ठिकाणी पोलीस संरक्षणदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.
– सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे

पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्रकल्पाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवासासाठी नागरिकांना वेळ लागतो. अशातच शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुट्टीसाठी निघालेल्या नागरिकांना बराच वेळ हा प्रवासातच जातो. यासर्वांमुळे या कामाबद्दल नागरिकांची नाराजी आहे. या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वीही विभागीय आयुक्त स्तरावरून तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. हे काम पूर्ण करण्यास संबधित ठेकेदार कंपनीकडून चालढकल करण्यात येत होती. या सर्वांचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

देहू रस्ता ते सातारा दरम्यानच्या सहा पदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांची डेडलाइन दिली होती. ती मुदत येत्या 31 मार्चला संपणार आहे. सद्यपरिस्थितीत नसरापूर, वेळू, खेडशिवापूर, वारजे, किकवी यासह 20 ते 25 किमी सर्व्हिस रस्त्याची कामे अपूर्णावस्थेत आहेत. यातील काही कामे सुरू होण्याचीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता देखील 31 मार्चची “डेडलाइन’ पाळली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, एका बाजूला भू-संपादनाची समस्या आणि दुसरीकडे स्थानिकांचा विरोध यामुळे बहुतांश कामे रखडली आहेत. ही कामे रखडण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आवश्‍यक बाबींची पूर्तता न झाल्याचे कारण ठेकेदार कंपनीकडून दिले जात आहे. तर, महामार्ग प्राधिकरणाने आवश्‍यक सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, आता सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असल्याचे स्पष्ट केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)