26 दिवसांचा कालावधी असल्याने उशीर
याबाबत रुग्णालय प्रशासनाची बाजू मांडताना सह्याद्री हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. जयश्री आपटे यांनी सांगितले की, हा रुग्ण 26 दिवसांआधी रुग्णालयात दाखल केला होता. त्यामुळे कागदपत्रे तपासणी, प्रमाणपत्र तयार करणे व अन्य प्रक्रिया याला वेळ लागला. सर्वसाधारण डिस्जार्चसाठी रुग्णालयाकडून योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले जाते आणि त्यासाठी तीन ते चार तास जातात. हे नियम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात ऍडमिट होताना सांगितले जाते. हॉस्पिटलच्या फलकावर लिहिले जाते व रुग्णांनाही याचे माहितीपत्रक दिले जाते. एखाद्या रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यासाठी आणखी कागदपत्रे लागत असल्याने या प्रक्रियेला उशिर लागतो. मृत्यू झाल्यानंतर रुग्णाला वाट पहावी लागणे हे मोठे दुखदायी असते. पण आम्ही हा वेळ कमीत कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, याचे नागरिकांना आश्वासन देतो असेही आपटे यांनी सांगितले.
नवसमाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल, प्रशासनाकडून स्पष्टीकरण
पुणे – सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे शव मिळविण्यासाठी तब्बल पाच तास घालवावे लागल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी समाज माध्यमांवर हॉस्पिटलच्या विरोधात संताप व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट समाजमाध्यमामध्ये चांगलीच व्हायरल झाल्यानंतर अखेर हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.
नंदू करंदीकर यांनी व्हॉटस्ऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून ही पोस्ट काही दिवसांपूर्वी व्हायरल केली. यामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे, कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याआधी जाणार असाल तर, सावधान असे म्हणत व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग व हॉस्पिटलमधील एकूणच कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, माझ्या सासूबाई प्रभा जोशी यांना दिनांक 16 एप्रिल 2018 रोजी कॅन्सरच्या उपचारासाठी तेथे ऍडमिट केले होते. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम 2.75 लाख रुपयांचे कोटेशन (अंदाजपत्रक) दिले. यानंतर 18 तारखेला ऑपरेशन झाले. त्यानंतर प्रथम आयसीयु, नंतर सेमी प्रायव्हेटमध्ये हलविले. त्यांचा हा प्रवास 11 मे 2018 रोजी दुर्दैवाने संपला. उपचारादरम्यान या कालावधीत दररोज बिलिंग विभागाचा माणूस द्यावयाची रक्कम व भरलेली रक्कम देत असे आणि रजिस्टरमध्ये माझी स्वाक्षरी घेत असे. मला तोपर्यंत रोजचे रोज बिलिंग होत असेल असा गैरसमज होता. 11 मे रोजी सव्वा चारच्या सुमारास त्यांच्या सासुबाईंचे निधन झाले आणि त्यापुढे रुग्णालयाच्या औपचारिकता (फॉर्म्यालिटी) सूरू झाल्या आणि त्यांची फाईल बिलिंग सेक्शनला गेली 4.45 वाजता. तीन तास उलटून गेले तरी, फाईल हातावेगळी होईना. कारण विचारले असता, 16 एप्रिलपासून बिल एन्ट्री करायची आहे, असे सांगण्यात आले.
त्यावेळी त्यांना विचारले की, अहो रोजचे रोज आउटस्टॅंडिंग (भरावयाचे बाकी) बिल असा सुधारित बिल आकडा आपण देत होता म्हणजे आपले बिलिंग रोज होत आहे. फक्त संकलीकरण करायचे मग एवढा वेळ कशाला? असा प्रश्न त्यांनी विचारला. तर, त्यावर बिलिंग विभागाच्या म्हणण्यानुसार रोज जी बिलाची रक्कम सांगितली जाते ती व्हेग असते. त्यामुळे हे बिलिंग करायला वेळ लागत असून फायनल बिल मिळेपर्यंत डिस्चार्ज नाही, असे सांगण्यात आले. सरतेशेवटी रात्री 10.25 वाजता रात्री बिल मिळाले (तब्बल साडेपाच तासांनी) व त्यानंतर शव मिळाले पण, तोपर्यंत 84 वर्षीय सासरे यांना अगतिकपणे वाट बघत बसावी लागली असल्याबाबत करंदीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच त्यांनी आणखी एक अनुभव सांगितला असून त्यामध्ये, या घटनेच्या आदल्या दिवशी त्यांच्या मावस भावाची बायको (सुजाता मराठे) पहाटे 5 वाजता गेल्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह बिलिंग करून तब्बल 7 तासांनी मिळाला. त्यावेळी त्यांना एका डॉक्टरने सांगितले की, संध्याकाळी 5 नंतर कोणीही सिनियर नसते आणि सेकंड व थर्ड शिफ्टमध्ये स्टाफ कमी असतो. या सर्व प्रकाराने संतप्त होऊन त्यांनी पोस्ट लिहिली असून अनेक समाजमाध्यमांमधील ग्रुपवर ही पोस्ट सध्या फिरत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा